Tue, Jul 23, 2019 02:30होमपेज › Sangli › ‘सागरेश्‍वर’साठी निधीची प्रतीक्षा कायम

‘सागरेश्‍वर’साठी निधीची प्रतीक्षा कायम

Published On: Feb 11 2018 12:57AM | Last Updated: Feb 10 2018 9:12PMदेवराष्ट्रे : विठ्ठल भोसले

यशवंतराव चव्हाण सागरेश्‍वर वन्यजीव अभयारण्याला निधीचा दुष्काळ भेडसावत आहे. दरम्यान, निधीच उपलब्ध नसल्याने  विविध महत्वाकांक्षी योजना रखडल्या आहेत. 

दरम्यान, या घोषित योजना आणि निधी मिळण्यासाठी वनविभागाकडून देखील पाठपुरावा होत नसल्याचे चित्र आहे. यामुळे  तत्कालीन आघाडी सरकारच्या काळात सुरू करण्यात आलेल्या आणि सुरू करण्यात येणार्‍या पर्यटन सफर, बोटिंग, हरिण पैदास केंद्र आदी योजना कागदावरच राहिल्या आहेत. 

सन 1972 मधील महाभयंकर दुष्काळात वृक्षमित्र धों. म. मोहिते यांच्या अथक प्रयत्नातून सागरेश्‍वर अभयारण्याची निर्मिती झाली. रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून अभयारण्याच्या ओसाड माळरानावर मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले.

अभयारण्याच्या निर्मितीत  नवमहाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण, ज्येष्ठ नेते वसंतदादा पाटील यांनी मोलाचे योगदान दिले आहे. मात्र त्यानंतरच्या काळात अभयारण्याकडे शासनाचे दुर्लक्ष झाले. तत्कालीन पालकमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी वनमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर अभयारण्यासाठी भरघोस निधी दिला. विविध उपक्रम राबविले. अभयारण्याचा विकास करण्यासाठी सातत्याने त्यांनी या भागाला भेटी देऊन येथील प्रश्‍न सोडविण्याचा प्रयत्न केला. पाण्याचा प्रश्‍न, कर्मचार्‍यांची कमतरता, संरक्षक कुंपण, पर्यटकांना निवास व्यवस्था यासाठी मोठ्या प्रमाणात निधी देऊन त्यांनी हे प्रश्‍न सोडवण्याचा प्रयत्न केला आहे.

डॉ. कदम हे वनमंत्री असताना  संरक्षित कुंपण, अ‍ॅम्पी थिएटर, विश्रामगृह, बांबू कुटी, बालोद्यान, माहिती केंद्र, पर्यटकांना प्रतीक्षा केंद्र, सिमेंटचे बंधारे, विहिरी, मातीचे बंधारे, प्रवेशव्दार कमान, मुख्य रस्ता, अंतर्गत रस्ते दुरूस्ती यांसारखी महत्वाची कामे करण्यात आली. याबरोबरच चांदोली अभयारण्यात हरणांचे पुनर्वसन करण्याची योजना सुरू करण्यात आली होती. हरिण पैदास केंद्र ही महत्वाकांक्षी योजना आखण्यात आली होती.

सागरेश्‍वर अभयारण्यातील हरणांचे चांदोली अभयारण्यात पुनर्वसन करण्याचा प्रशासनाचा गेल्या अनेक वर्षांचा प्रस्ताव  आहे. यासाठी काही वर्षांपूर्वी दहा लाखांची तरतूद करण्यात आली होती. एक विशिष्ट प्रकारचा सापळा तयार करुन त्यामध्ये ओला चारा टाकण्यात येत होता.

चार्‍याच्या मोहाने हरिण त्यामध्ये जात असत. मात्र काही कारणास्तव ही योजना तात्पुरती बंद करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. सागरेश्‍वर अभयारण्यातील मोकाट हरणांमुळे परिसरातील शेतीचे प्रचंड नुकसान होत आहे. सध्या अभयारण्यातील कामे पूर्णपणे थांबलेली आहेत.