Sat, Apr 20, 2019 18:41होमपेज › Sangli › मिरजेला फुटबॉल सामन्याची प्रतीक्षा

मिरजेला फुटबॉल सामन्याची प्रतीक्षा

Published On: Dec 11 2017 1:34AM | Last Updated: Dec 10 2017 11:42PM

बुकमार्क करा

मिरज : जालिंदर हुलवान

मिरज जसे आरोग्यपंढरी आणि संगीतनगरी म्हणून प्रसिद्ध आहे. तसेच फुटबॉल या खेळातही मिरजेचा लौकिक आहे. फुटबॉल या खेळाचीही मिरजेला मोठी परंपरा आहे. मिरजेत अनेक राष्ट्रीय फुटबॉलपटू तयार झाले. गेल्या शतकापासून मिरजकरांनी हा खेळ जपला आहे. पण आज या खेळाकडे व छत्रपती शिवाजी क्रीडांगणाकडे दुर्लक्ष झाल्याने हा फुटबॉल खेळ संपतो की काय ? अशी भीती निर्माण झाली आहे. खेळाडू फुटबॉल सामन्यांच्या प्रतीक्षेत आहेत.

मिरजेत फुटबॉल खेळ सुरू झाला तो 1900 च्या सुमारास. त्यापूर्वी मिरजेत सर डॉ.विल्यम वॉन्लेस, डॉ.रिचर्डसन यांनी मिशनरी कार्य सुरू केले होते. त्यातून मिशन (आताचे वॉन्लेस हॉस्पीटल) हॉस्पीटलही सुरू झाले होते. या रुग्णालयातील अनेक डॉक्टर मिशन कंपाऊंडमध्ये फुटबॉल खेळत होते. या खेळासाठी फुटबॉल क्‍लब स्थापन करण्याचा विषय पुढे आला. डॉ. ई.एच. इव्हेन्स, डॉ. आर.एच. गोहीन, डॉ. डब्ल्यु.ए. सिसील, डॉ. ए.जी. फ्लेचर या अमेरिकन मिशनरींच्या पुढाकाराने फुटबॉल खेळ बहरत गेला. डॉ. मधुकर कांबळे, युसुफ पठाण, सिद्धु मेस्त्री, बापू चोपडे, गोविंद भोरे, यशवंत पाटील, गोपाळ भोरे,  दत्तू भोरे, शिवलिंग भोरे, योहान लोंढे, पठाण शेट्टी, तानाजी कांबळे, शाहू कांबळे आदींनी फुटबॉलची बिजे रोवली.

सध्या मिरजेत फुटबॉलचे सामने हे छत्रपती शिवाजी क्रीडांगणावर होतात. 1960 पासून या क्रीडांगणावर फुटबॉल खेळला जातो. याच क्रीडांगणावर रेल्वे यंग बॉईज, ब्ल्यू स्टार फुटबॉल क्‍लब, मराठे टेक्स्टाईल फुटबॉल क्‍लब,  बालवीर फुटबॉल क्‍लब, जे. के. फुटबॉल क्‍लब, शायनिंग स्टार वॉन्लेसवाडी फुटबॉल क्‍लब, सांगली पोलिस, शिवाजी फुटबॉल क्‍लब, लकी स्टार असे क्‍लब तयार झाले. या क्लबमधून अनेक चांगले खेळाडू तयार झाले.  

पूर्वी जामदार चषक हे मानाचे मानले जात होते. गेल्या काही वर्षांपासून महापौर चषक,  जयंत चषक, डायमंड  चषक, सांगली डिस्ट्रीक असोसिएशन चषक अशा अनेक स्पर्धा घेतल्या जातात. पूर्वी 12 महिने येथे फुटबॉल चालत होता. वर्षभरात सुमारे 20 हून अधिक फुटबॉलच्या स्पर्धा होत होत्या. पण गेल्या काही वर्षांमध्ये हळूहळू या स्पर्धांचे आयोजन कमी हाऊ लागले.   

पूर्वी मिशन कंबाईन क्‍लब, जत संस्थान, सांगली संस्थान, पंढरपूर आणि कोल्हापूरचा असे पाच क्‍लब येथील फुटबॉल स्पर्धेत सहभागी होत होते. त्यानंतर गोवा, कलकत्ता, केरळ, मध्यप्रदेश, दिल्ली, बेंगलोर, महाराष्ट्र, पंजाब,  हैद्राबादसह विविध राज्यांमधून फुटबॉल क्‍लब सहभागी होत होते. पुरूषांबरोबरच महिलांच्याही स्पर्धा मिरजेत होत होत्या. दिवसाबरोबर रात्री फ्लड लाईटमध्येही स्पर्धा व्हायच्या. मिरजेतील तौफीक सय्यदने चीनमध्ये तर मिलन वारे याने मलेशियामध्ये फुटबॉलचे मैदान गाजविले.

येथील छत्रपती शिवाजी क्रीडांगणामध्ये गटरीचे पाणी साचलेले होते. त्यामुळे क्रीडांगण पूर्णपणे खराब झाले. त्यामुळे खेळाडूंना प्रॅक्टीसही करता येत नाही. अनेक वेळा  फुटबॉलप्रेमींनी आंदोलने केली. पण महापालिकेने त्याकडे दुर्लक्ष केले. गेल्या चार ते पाच वर्षांमध्ये या फुटबॉल खेळाला ग्रहण लागले. सांगली जिल्हा फुटबॉल असोसिएशनने आता सामने घेण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे,अशी मागणी फुटबॉलप्रेमींमधून होत आहे.