Wed, Mar 20, 2019 08:31होमपेज › Sangli › विटा पालिकेच्या कामकाजात स्वीकृत नगरसेवकाचा हस्तक्षेप 

विटा पालिकेच्या कामकाजात स्वीकृत नगरसेवकाचा हस्तक्षेप 

Published On: Feb 07 2018 3:18PM | Last Updated: Feb 07 2018 3:18PMविटा : विजय लाळे 

विटा पालिकेच्या प्रशासकीय कामकाजात सत्ताधारी स्वीकृत नगरसेवक वैभव पाटील यांचा हस्तक्षेप होत आहे.  मुख्याधिकाऱ्यांसह सर्व कर्मचारी त्यांच्या दबावाखाली काम करीत आहेत. सर्व-सामान्य जनतेची कामे होत नाहीत. त्यांची पिळवणूक होते, असा घणाघाती आरोप विरोधी शिवसेना नगरसेवक अमर शितोळे यांनी केला आहे.  

याबाबत नगरसेवक शितोळे यांच्यासह माजी उपनगराध्यक्ष संजय भिंगारदेवे, समीर कदम, शहराध्यक्ष राजू जाधव आदींनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत विटा पालिकेच्या कारभाराबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालावे अशी मागणी करणार असल्याचे सांगितले. 

यावेळी नगरसेवक शितोळे यांनी शहरातील पाच लोकांच्या जागेच्या रेखांकनाचा विषय सविस्तर सांगितला. ते म्हणाले, या लोकांचे रेखांकनाचे पैसे भरून घ्यावेत असे आदेश मुख्याधिकाऱ्यांनी दिले आहेत. गेल्या सहा महिन्यापासून ही मंडळी पालिकेत चकरा मारत होती. परवा ५ जानेवारी रोजी मी स्वतः त्या लोकांना घेऊन पालिकेत गेलो. त्यावेळी दोन वाजल्यापासून पाच वाजेपर्यंत आता करतो, नंतर करतो असे सांगत वेळ मारून नेली. 

पाच वाजता सहाय्यक नगर रचनाकार मुनीर पिरजादे आणि खुशाल पवार या दोघांनी आमच्या जवळची ओरिजिनल चलनाची कागदपत्रे घेतली आणि लगेच येतो म्हणून गेले ते आलेच नाहीत.  विशेष म्हणजे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी त्या दोघांना फोन करून संबंधितांचे चलन भरून द्या असा आदेश दिला होता. परंतु या नंतर त्यांनी फोनसुद्धा स्विच ऑफ केला होता. त्यावर आम्ही जो पर्यंत हे काम होत नाही तोपर्यंत हलणार नाही असा पवित्रा घेतला. त्यानंतर रात्री सव्वा नऊ वाजता मुख्याधिकारी सांगलीहून आल्यानंतर पैसे भरून घेतले गेले. 

याबाबत आमची मागणी आहे कि, संबंधित दोघे निलंबित झाले पाहिजेत. त्या शिवाय पालिकेच्या कर्मचाऱ्यांवर मुख्याधिकाऱ्यांचा अंकुश राहणार नाही. 

माजी उपनगराध्यक्ष भिंगारदेवे म्हणाले, पालिका काही कामे ठेके देऊन  कर्मचारी नेमते, पण विट्यात तर पालिकाच ठेकेदाराच्या हातात असल्यासारखी स्थिती झाली आहे. प्रशासन आणि जनता यांचा संबंधच येऊ नये अशी रचना पालिकेत केली आहे. मुख्याधिकारीच्या केबिन बाहेर लोकांना बसायची साधी सोय सुद्धा नाही. तर श्री. कदम यांनी आम्ही नागरी प्रश्नासंदर्भात माहितीच्या अधिकाराखाली वेळोवेळी माहिती मागितली, मुख्याधिकाऱ्यानी अपिलीय अधिकारी म्हणून आदेश देऊनही माहिती दिली जात नाही. दरम्यान शहराध्यक्ष राजू जाधव यांनी नागरिकांनी आपल्या नागरी समस्यांबाबत शिवसेनेशी संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.