होमपेज › Sangli ›  पेन्शनसाठी जनता दलाचा विट्यात मोर्चा 

 पेन्शनसाठी जनता दलाचा विट्यात मोर्चा 

Published On: Dec 31 2017 6:18PM | Last Updated: Dec 31 2017 6:18PM

बुकमार्क करा

विटा : विजय लाळे  

६० वर्षावरील सर्व लोकांना देशातील इतर ११ राज्यांच्या प्रमाणे महाराष्ट्राने दर महा २ हजार रुपये पेन्शन लागू करावी, या मागणीसाठी विटा तहसील कार्यालयावर माजी आमदार शरद पाटील यांच्या नेतृत्वाखाली जनता दलाच्या वतीने सोमवारी १ जानेवारी रोजी मोर्चाचे आयोजन केले आहे. अशी माहिती पक्षाचे तालुकाध्यक्ष आबासाहेब सागर यांनी दिली आहे. 

यावेळी सागर म्‍हणाले, गेली ६ वर्षे आम्ही ६० वर्षावरील सर्व लोकांना देशातील इतर ११ राज्यांच्या प्रमाणे महाराष्ट्राने दर महा २ हजार रुपये पेन्शन लागू करावी, या मागणीसाठी लढा देत आहोत. मागच्या काँग्रेस सरकारने पेन्शन देऊ म्हणून आश्वासन दिले होते परंतु ते पूर्ण केले नाही. भाजप सरकारच्या काळात मुख्यमंत्री फडणवीस आणि तत्कालीन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीसुद्धा गेल्या ३ वर्षात ३ वेळा आम्ही पेन्शन लागू करतो असे आश्वासन दिले आहे . गतवर्षी ८ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्र्यांनी गोवा, केरळ आणि तामिळनाडू राज्यांच्या धर्तीवर महाराष्ट्रात पेन्शन देता येते का याबाबत अभ्यास करून निर्णय घेतो असे आश्वासन आमच्या पक्षाच्या शिष्टमंडळाला दिले होते. परंतु अद्याप काहीही कार्यवाही झालेली नाही. मात्र गेल्या हिवाळी अधिवेशनात राज्यातील १६० माजी आमदारांना मिळत असलेल्या ४० हजार रुपयांच्या पेन्शन मध्ये १० हजाराची वाढ करून दर महा ५० हजार रुपये केली आहे. तसेच सरत्या वर्षाच्या ३१ मार्च रोजी राज्याच्या विधान परिषदेत आमदार रामहरी रुपनवर यांनी पेन्शन बाबत विधेयक मांडले आहे आणि १५ ऑक्टोबर रोजी ६० वर्षांच्या वरील सर्वांना पेन्शन लागू करण्याबाबतचा प्रस्ताव कृषी विभागाकडे देखील गेला आहे. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी विधी मंडळात केवळ कृषी विभाग त्यावर विचार करीत आहे असे म्हटले आहे. आमची आता मागणी आहे कि या विषयावर स्वतंत्र अधिवेशनचं बोलावण्यात यावे. दरम्यान या मागणीसाठी आम्ही नव्या वर्षात विटा तहसील कार्यालयापासून आंदोलनाला सुरुवात करणार आहोत असेही सागर यांनी सांगितले आहे.