Sat, May 30, 2020 10:04होमपेज › Sangli › सांगली : विटा शहरातील ७ हजार विद्यार्थ्यांनी घेतली स्वच्छतेची शपथ

सांगली : विटा शहरातील ७ हजार विद्यार्थ्यांनी घेतली स्वच्छतेची शपथ

Published On: Jan 01 2018 2:45PM | Last Updated: Jan 01 2018 2:43PM

बुकमार्क करा
विटा : प्रवीण धुमाळ

स्वच्छता सर्वेक्षण २०१८ स्पर्धेच्या निमित्ताने  शहरातील सर्व प्राथमिक शाळा, माध्यमिक विद्यालये, उच्च माध्यमिक विदयालय, महाविद्यालयांनी आपल्या शाळेच्या, कॉलेजच्या ठिकाणापासून ते शहरातून फेरी काढत शाळा क्रमांक दोनमध्ये आल्या. या ठिकाणी सुमारे ७ हजार विद्यार्थ्यांनी स्वच्छतेची शपथ घेतली. यावेळी नगराध्यक्षा  प्रतिभाताई पाटील, स्वच्छता दूत  वैभव  पाटील, मुख्याधिकारी महेश रोकडे याबरोबरच नगरपरिषदेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना वैभव  पाटील यांनी महाराष्ट्र राज्यात आपली नगरपालिका अग्रेसर असून स्वच्छ सर्वेक्षण-२०१८ या स्पर्धेत भारतामध्ये पहिल्या पाच क्रमांकात येण्यासाठी शहरातील नागरिकांनी योगदान द्यावे. शहराला देशाच्या नकाशावर स्वच्छ शहर म्हणून नावलौकिक मिळवण्यासाठी हातभार लावावा. या स्पर्धेत देशात पहिल्या पाच क्रमांकात आल्यास भारत सरकारकडून २५ कोटी व  महाराष्ट्र शासनाकडून १५ कोटी असे ४० कोटीचे बक्षीस मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

नगराध्यक्षा  प्रतिभा पाटील यांनी सर्व नागरिकांना या स्वच्छता अभियानामध्ये सहभागी होण्यासाठी आवाहन केले. मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी सर्व उपस्थित विद्यार्थी, नागरिक यांना स्वच्छतेची शपथ दिली. सर्व विटेकरांनी तन-मन-धन देऊन सहभागी व्हावे व विटा शहराचा देशात नावलौकिक मिळवण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन केले.

स्वच्छ भारत करण्यासाठी भारत सरकार आणि महाराष्ट्र शासन विविध योजना राबवत आहे. त्याचाच भाग म्हणून स्वच्छता सर्वेक्षण २०१८ ही स्पर्धा राबवण्यात येत आहे. विटा नगरपरिषद या स्पर्धेमध्ये अग्रस्थानी आहे. या निमित्तानेच शहरातील सर्व शाळा, कॉलेज सहभागी होत स्वच्छता जनजागृती महाफेरीचे आयोजन केले होते. लोकनेते  हणमंतराव पाटील शाळा क्रमांक दोनच्या प्रांगणात शपथ घेण्यासाठी व्यवस्था केली होती. या ठिकाणी सुमारे  ७ हजार ५०० विद्यार्थी एक हजार नागरिक उपस्थित होते.  

या महाफेरीत नगरपरिषदेच्या १ ते १९ क्रमांकाच्या सर्व शाळा, लोकनेते  हणमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचालित आदर्श शैक्षणिक संकुलातील सर्व शाळा, विद्यालये, महाविद्यालये,मॉडर्ण एज्युकेशन सोसायटी च्या सर्व शाळा, बळवंत महाविद्यालय, विटा हायस्कूल विटा, संजय भगवानराव उच्च माध्यमिक विद्यालय, क्रांतिसिंह नाना पाटील लोकविद्यापीठ शैक्षणिक संकुल, वैभव शिक्षण संस्थेच्या सर्व शाळा, उर्दू माध्यमिक विद्यालय, इंदिरा भिडे कन्या प्रशाला, विजयमाला पतंगराव कदम शाळा, बनशंकरी शैक्षणिक संकुल आदी शाळातील विद्यार्थी विविध व पारंपारिक वेशभूषेत स्वच्छतेचा संदेश देत सहभाग घेतला होता. तसेच या कार्यक्रमाच्या नेटक्या संयोजनासाठी आदर्श महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या स्वयंसेवकांनी योगदान दिले.

उपनगराध्यक्ष किरण तारळेकर यांनी स्‍वागत केले. कार्यक्रमास नगरसेवक अनिल म. बाबर, सुभाष भिंगारदेवे, दहावीर शितोळे, नगरसेविका मीनाक्षी पाटील, मनीषा शितोळे, सारिका सपकाळ, प्रतिभा चोथे, नेहा डोंबे, वैशाली सुतार, प्रगती कांबळे,महेश दाजी कदम, डॉ प्रकाश मोकाशी, प्रशासन अधिकारी विकास राजे, पी.टी. पाटील, सर्व शाळांचे शाळाप्रमुख, शिक्षक, विद्यार्थी, तरुण युवक, नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन विटा नगरपरिषद विटा व शिक्षण विभाग विटा यांनी केले. माणिक कांबळे, मोहम्मद रफिक हलगले यांनी सूत्रसंचालन केले.