Sat, Jun 06, 2020 07:52होमपेज › Sangli › विटा नगरपरिषदेस “हरित महासिटी कंपोस्ट” प्रमाणपत्र

विटा नगरपरिषदेस “हरित महासिटी कंपोस्ट” प्रमाणपत्र

Published On: Dec 28 2017 9:16PM | Last Updated: Dec 28 2017 9:16PM

बुकमार्क करा
विटा : वार्ताहर 

विटा नगरपरिषदेला महाराष्ट्र शासनाच्या वतीने मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नगराध्यक्षा सौ. प्रतिभाताई पाटील, मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी विटा नगरपरिषदेच्यावतीने हरित महासिटी कंपोस्ट प्रमाणपत्र स्वीकारले. संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून चार नगरपालिकांना हरित महासिटी कंपोस्ट हा ब्रांड वितरीत करण्यात आला आहे. यामध्ये विटा नगरपरिषदेला प्रथम स्थान मिळाले आहे.

विटा शहर उत्कृष्ट घनकचरा व्यवस्थापणामध्येही अव्वल आहे. स्वच्छ भारत अभियानाच्या अंतर्गत विलगीकरण केलेल्या ओल्या कचऱ्यापासून तयार होणाऱ्या खताच्या विक्रीसाठी हरित महासिटी कंपोस्ट प्रमाणपत्र मिळाले आहे. तयार करण्यात येत असलेले कंपोस्ट खत कृषी विभागाने घातलेल्या अटी व शर्ती पूर्ण करीत आहे. महाराष्ट्र शासनाचा हा ब्रॅड मिळाल्यामुळे कंपोस्ट खताच्या विक्रीमध्ये वाढ होणार आहे. याबरोबरच दर जास्त मिळणार आहे. नगरपालिकेने यामध्ये जास्त प्रमाणात लक्ष घालावे म्हणून प्रति टन १५००/- रुपये अनुदान महाराष्ट्र शासनाकडून देण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील विटा, सासवड, सावनेर, कळमेश्वर चार नगरपालिकांनाच हा ब्रॅड वितरीत करण्यात आला आहे.

विटा नगरपरिषदेच्या वतीने प्रमाणपत्र स्विकारण्यासाठी नगराध्यक्षा सौ. प्रतिभाताई पाटील माजी नगराध्यक्ष अॅड. वैभव दादा पाटील, मुख्याधिकारी महेश रोकडे साहेब उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नगरविकास सचिव मनीषा म्हैसकर, नितीन करीर सर्व महापालिकांचे आयुक्त आणि महापौर उपस्थित होते. व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी, सर्व नगरपालिकांचे मुख्याधिकारी आणि नगराध्यक्ष उपस्थित होते.

पालिकेच्या उत्पन्नात वाढ होणार: महेश रोकडे
विटा पालिकेला हरित महाब्रॅण्ड मिळाल्याने हे खत बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे पालिकेच्या उत्पन्नात भर पडणार असल्याचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी सांगितले.

कचऱ्यापासून वीजनिर्मिती करणार: प्रतिभा पाटील 
भविष्यात ओल्या कचऱ्यापासून वीज निर्मिती करण्याचा विटा पालिकेचा मानस आहे. शहरातील पथदिवे या विजेवर चालवता येतील का याचा अभ्यास सुरू आहे. या शिवाय कचऱ्यापासून विलग केलेला प्लॅस्टिकचा उपयोग शहरातील डांबरिकारणासाठी करणार असल्याचे नगराध्यक्षा प्रतिभा पाटील यांनी सांगितले.