होमपेज › Sangli › युवराज नव्हे, अशोक कामटेंना डोळ्यापुढे ठेवा : नांगरे-पाटील(व्‍हिडिओ)

युवराज नव्हे, अशोक कामटेंना डोळ्यापुढे ठेवा : नांगरे-पाटील(व्‍हिडिओ)

Published On: Dec 02 2017 5:13PM | Last Updated: Dec 02 2017 5:13PM

बुकमार्क करा


विटा : विजय लाळे 

'जनतेने युवराज कामटेच्या कृत्यांवरून पोलिसांची ओळख बनवू नये, तर शहीद अशोक कामटे साहेबांना डोळयापुढे ठेवून त्यांच्या कार्यावरून पोलिसांवर विश्वास ठेवावा,' असे भावनिक आवाहन कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे -पाटील यांनी केले. सांगली जिल्ह्यातील विटा पोलिस स्टेशनच्या कामकाजाची वार्षिक तपासणी करण्यासाठी आणि स्टार-१०० संवाद आणि मार्गदर्शन या कार्यक्रमात नांगरे -पाटील यांनी जनतेशी संवाद साधला. या वेळी जिल्हा पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा, उपविभागीय पोलिस अधिकारी अमरसिंह निंबाळकर, पोलिस निरीक्षक रवींद्र पिसाळ यांच्यासह कडेगाव आणि आटपाडी पोलिस ठाण्याचे अधिकारी प्रमुख उपस्थित होते. नांगरे-पाटील यांनी सुरुवातीला नागरिकांचा समस्या आणि प्रश्न ऐकून घेतले. 

त्यानंतर ते म्हणाले, 'जिल्ह्यातील कोथळे प्रकरणाने जनतेचा पोलिसांच्यावरचा विश्वास उडाला की काय अशी शंका यावी असे वातावरण तयार झाले. जरूर काही चुका झाल्या असतील परंतु, संपूर्ण पोलिस दल एकच नजरेतून पाहणे चुकीचे आहे. कोथळे प्रकरण घडले त्या वेळी पोलिस आणि नागरिक यांच्यात संवादाचा कार्यक्रम सुरु होता. मधूनच युवराज कामटे तेथून निघून गेला त्याचदिवशी त्याने आणि त्याच्या साथीदारांनी अमानुष कृत्य केले. परंतु, आम्ही आता त्या प्रकरणात एवढे भक्कम पुरावे तयार केले आहेत की न्यायालयात त्यांना कठोर शिक्षा मिळेल.'

कोल्हापूर परिक्षेत्राला  गुन्हे उघडकीस आणण्यात देशात दुसरा क्रमांक मिळाला आहे. ही माहिती आम्ही ज्या दिवशी मीडियाला देणार त्याच दिवशी कोथळे प्रकरण घडले आणि जनतेच्या मनात पोलिसांच्या कार्यशैलीवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले अशी खंत हि त्यांनी व्यक्त केली. महाराष्ट पोलिसांमध्ये अशोक कामटे, हेमंत करकरे , तुकाराम ओंबाळे या सारख्या धाडसी जीवावर उदार होऊन काम करणाऱ्यांची परंपरा आहे. मात्र युवराज कामटे याने या परंपरेला काळिमा फासण्याचे काम केले. सांगलीला जो नवीन जिल्हा पोलिसप्रमुख दिला आहे  त्यांचे काम अतिशय चांगले आहे मी त्यांचे काम जवळून पाहिले आहे . अवैध दारू विक्री, वाळू तस्करी, सावकारी , मुलींच्याच छेडछाडी वगैरे प्रकार आटोक्यात आणण्यात त्यांना यश मिळेल, असी अपेक्षा नांगरे-पाटील यांनी व्यक्त केली.