Thu, Apr 25, 2019 13:28होमपेज › Sangli › भाजपमुळे जत तालुका विकासापासून वंचित

भाजपमुळे जत तालुका विकासापासून वंचित

Published On: Feb 04 2018 10:56PM | Last Updated: Feb 04 2018 10:38PMजत : प्रतिनिधी

भाजप आमदार व मंत्र्यांनी गेल्या चार वर्षांत भूलथापा देऊन जनतेला भुलविण्याचे काम केले आहे. कोणतेही नवीन काम न करता जत तालुका विकासापासून वंचित ठेवला आहे. त्यामुळे विक्रम सावंत यांच्यासारख्या काँग्रेसच्या नेतृत्वाच्या पाठीशी जनतेने ठामपणे उभे रहावे, असे अवाहन युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डॉ. विश्‍वजित कदम यांनी केले.

काँग्रेस नेते, जिल्हा बँकेचे संचालक व जि.प. सदस्य विक्रम सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त पाणी परिषद, डाळिंब चर्चासत्र व सत्कार कार्यक्रमाचे आयोजन येथील मार्केट यार्डात करण्यात आले होते. या कार्यक्रमास आमदार मोहनराव कदम, माजी आमदार उमाजीराव सनमडीकर, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष आनंदराव मोहिते, काँग्रेस अध्यक्ष पृथ्वीराज पाटील, कर्नाटक प्रदेश काँग्रेसचे सदस्य राजू पाटील, बाजार समितीचे सभापती दिनकर पाटील, नगराध्यक्षा शुभांगी बन्‍नेनवर, पं. स. चे माजी सभापती बाबासाहेब कोडग, तालुका अध्यक्ष आप्पाराया बिराजदार आदी उपस्थित होते.

वाढदिवसानिमित्त सावंत यांचा मान्यवरांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. तालुक्यातील कार्यकर्त्यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी डॉ. कदम म्हणाले, पतंगराव कदम पालकमंत्री असताना टंचाई निधीतून जत तालुक्याला म्हैसाळ योजनेचे पाणी दिले. आता पैसे भरूनही दुष्काळी जनतेला भाजपने पाणी दिले नाही. 42 गावचा पाणीप्रश्‍न सोडविण्यात अपयश आले आहे. विक्रम सावंत सत्तेत नसतानाही त्यांनी कर्नाटक शासनाशी संपर्क साधून तुबची बबलेश्‍वर योजना करण्यासाठी पाठपुरावा सुरू केला आहे. अशा नेतृत्वाच्या मागे आता जनतेने राहण्याची नितांत गरज आहे.

विक्रम सावंत म्हणाले, जत तालुक्याच्या पूर्वभागातील 52 गावांसाठी कर्नाटकातील तुबची बबलेश्‍वर योजना करण्यासाठी कर्नाटकातील पाटबंधारे मंत्री यांच्याशी बैठक झाली आहे. अनेक वर्षांपासून या योजनेचा आपण पाठपुरावा केला आहे. त्यासाठी कर्नाटक शासन अनुकूल आहे.