Sun, Aug 25, 2019 07:56होमपेज › Sangli › पर्यटकांची पाऊले कांडवणच्या ‘कानसा’ जलाशयाकडे

पर्यटकांची पाऊले कांडवणच्या ‘कानसा’ जलाशयाकडे

Published On: Feb 24 2018 1:13AM | Last Updated: Feb 23 2018 10:07PMवारणावती : आष्पाक आत्तार   

सह्याद्रीचा पश्‍चिम घाट म्हणजे जैव विविधतेने नटलेला आणि निसर्गाचा अद्भुत नजराणा! या निसर्ग सौंदर्याबरोबरच आता बोटिंगचा आनंद घेण्याची संधी पर्यटकांना निर्माण झाली आहे. कांडवण (ता. शाहुवाडी) येथील कानसा जलाशयात प्रथमच बोटिंगची सुविधा करण्यात आली आहे. त्यामुळे या परिसरात येणार्‍या पर्यटकांची संख्या वाढू लागली आहे. जलाशयात बोटिंग करून पर्यटक मनमुराद आनंद घेताना दिसत आहेत.

सह्याद्रीच्या रांगेतील उंचच उंच पर्वतरांगा, त्यातून कोसळणारे छोटे-मोठे धबधबे, हिरवीगार वनराई पर्यटकांना भुरळ घातल्यावाचून रहात नाही. म्हणूनच दररोज शेकडो पर्यटक चांदोलीच्या या परिसराला भेट देऊन निसर्गाचा आनंद लुटतात शाहुवाडी तालुक्यातील कांडवण परिसर हा सह्याद्रीच्या डोंगररांगात येतो. डोंगरदर्‍या, घनदाट झाडी, कानसा नदीचे खोरे, विविध वन्यप्राणी, पक्ष्यांचा वावर व नैसर्गिक भू-रुपांनी समृद्ध असा हा भाग. परिसर दुर्गम असला तरी, कानसा नदीच्या 
पाण्यामुळे सुजलाम सुफलाम झाला आहे. पावसाळ्यात धो-धो कोसळणारा पाऊस व डोंगरकपारीतून वाहणारे छोटे-मोठे धबधबे पर्यटकांना नेहमीच खुणावतात.

चांदोलीपासून जवळच असणारा हा परिसर संपर्काच्या बाबतीत तसा ‘नॉट रिचेबल’. त्यामुळे कांडवण, मालगाव, कोकणेवाडी, थावडे, विरळे, जांभूर परिसरात जाणार्‍या कोणाही पर्यटकाला तेवढाच एकांत व निवांतपणा मिळतो. चांदोली मार्गावरून कांडवणलाही जाता येते. त्यामुळे चांदोलीला येणार्‍या पर्यटकांचे पाऊल आपसूकच कांडवणच्या जलाशयाकडे वळू लागले आहे. हा जलाशय सध्या फुल्ल आहे. त्यामुळे पर्यटकांना बोटिंगमधून जलसफारीचा आनंद मिळू लागला आहे. लवकरच येथे रिसॉर्टही सुरू होणार आहेत.

कांडवण येथे जाणारा रस्ता  पक्का आहे. कांडवण येथे कानसा नदीवर मातीचे छोटे धरण आहे. एका बाजूला सांडवा आहे. यावर्षी पाऊसकाळ चांगला राहिल्याने धरणात पाणीसाठा चांगला आहे. धरणापासून सुमारे दोन कि.मी. पेक्षा जास्त भागात पाणी आहे. धरणाच्या दोन्ही बाजूला जंगलात भ्रमंतीसाठी पाऊलवाटा आहेत. या वाटेने असंख्य पर्यटक जंगलात जातात. मात्र काही हुल्लडबाज पर्यटकांकडून वनसंपदेला हानी पोहोचवण्याचाही प्रकारही घडतो. याचा वन्यप्राणी, पक्ष्यांना त्रास होतो. पर्यटनाचा आनंद लुटताना वनसंपदेच्या रक्षणाचे त्यांनी भानही ठेवायला हवे. पर्यटकांची संख्या वाढू लागल्यामुळे वनविभागानेही या परिसराकडे जाणीवपूर्वक लक्ष देण्याची गरज आहे.