Thu, Jul 18, 2019 02:07होमपेज › Sangli › वाळव्यात राजकीय वातावरण तापले

वाळव्यात राजकीय वातावरण तापले

Published On: Feb 23 2018 1:18AM | Last Updated: Feb 22 2018 8:23PMइस्लामपूर : मारूती पाटील

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौर्‍यानंतर राष्ट्रवादीचे पदाधिकारी व नगरसेवक आणि नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांच्यात सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांचे सत्र जोरात सुरू आहे. खासदार राजू शेट्टी यांची राजारामबापू दूध संघास भेट यामुळे वाळवा तालुक्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीपर्यंत तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलतील, अशी चिन्हे दिसत आहेत. कृषी महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंंद्र फडणवीस यांनी आमदार जयंत पाटील यांच्यावर थेट तोफ डागली. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपचे जयंत पाटील हेच ‘टार्गेट’ असल्याचे स्पष्ट केले. तत्पूर्वी आ. जयंत पाटील यांनीही मुख्यमंत्र्यांनी इस्लामपूरसाठी किती निधी दिला, असा सवाल करत या वादाला तोंड फोडले होते. तेंव्हापासून राष्ट्रवादी व नगराध्यक्षांच्यात राजकीय आरोप-प्रत्त्यारोप सुरू झाले आहेत. 

वर्षभरात विधानसभा निवडणुका येत आहेत. तत्पूर्वीच तालुक्यात राजकीय चर्चा सुरू झाली आहे. इस्लामपूर नगरपालिकेत सत्तांतर करून विकास आघाडीने आ.  पाटील यांना धक्का दिला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत विकास आघाडीचा आत्मविश्‍वास वाढणार आहे. नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी  जयंत पाटील यांच्यावरच थेट टीका सुरू केली आहे. ते विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार म्हणून पुढे येऊ शकतात, अशीही चर्चा  आहे. ना. सदाभाऊ खोत यांच्या मदतीने इस्लामपूर मतदारसंघात भाजपची ताकद वाढविण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. राष्ट्रवादीचे वैभव शिंदे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना भाजपमध्ये घेऊन आ. पाटील यांना शह देण्याचाही प्रयत्न केला आहे.

नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादीच्या विरोधात सर्व विरोधक एकवटल्याने राष्ट्रवादीचा पराभव शक्य झाला.  ना. खोेत व खा. राजू शेट्टी यांच्यात फारकत झाल्यापासून खा. शेट्टी यांची राष्ट्रवादीशी जवळीक वाढली आहे. त्याच पार्श्‍वभूमीवर खा. शेट्टी यांनी राजारामबापू दूध संघास भेट देवून ना. खोत यांच्यावर कडी करण्याचा प्रयत्न केला आहे.  विधानसभा निवडणुकीत खा. शेट्टी यांची काय भूमिका असणार?  विकास आघाडीत नानासाहेब महाडिक, हुतात्मा गटाची भूमिका महत्त्वपूर्ण असते. ते यावेळी भाजपचा उमेदवार स्वीकारणार का? सर्व विरोधकांचे उमेदवारीवरून एकमत होणार का? याचीही उत्सुकता असणार आहे.