सांगली : प्रतिनिधी
स्थळांचे संपर्क क्रमांक, पत्ते देण्याच्या नावाखाली फसवणूक केल्याप्रकरणी शनिवारी राजकिशोर वधू-वर सूचक केंद्राला नागरिकांनी टाळे ठोकले. शहरातील उत्तरशिवाजीनगरमध्ये असणारे केंद्र उघडण्याच्या तयारीत असणार्या केंद्रचालक राजकिशोर शिंदे याच्या मुलाला जाब विचारत रहिवाशांनी फैलावर घेतले. त्यानंतर शिंदेच्या मुलासह भावाने पुन्हा केंद्र न उघडण्याची ग्वाही दिल्यानंतर लोक शांत झाले.
राजकिशोर शिंदे व त्याची पत्नी या दोघांचे उत्तरशिवाजीनगर येथे वधू-वर सूचक केंद्र आहे. स्थळांचे पत्ते, संपर्क क्रमांक देण्यासाठी शिंदे दाम्पत्याने अनेकांची हजारो रुपयांना फसवणूक केली, अशी तक्रार आहे. याप्रकरणी चार दिवसांपूर्वी विश्रामबाग पोलिस ठाण्यात या दाम्पत्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर तक्रारदारांची रीघ लागली आहे.
याप्रकरणी चौघांनी फसवणूक झाल्याची तक्रार केली आहे. शनिवारी सकाळी राजकिशोर शिंदे यांचा मुलगा केंद्र उघडण्यासाठी आल्याचे समजल्यानंतर शिवसेनेचे नेते पृथ्वीराज पवार, सामाजिक कार्यकर्त्या रेखा पाटील तसेच तेथील रहिवासी जमा झाले. त्यांनी शिंदेच्या मुलाला केंद्र उघडण्यास सांगितले. मात्र, त्याने नकार दिला. त्यानंतर चिडलेल्या नागरिकांनी केंद्राचे कुलूप तोडले. त्यानंतर पवार यांच्यासह नागरिक केंद्रात गेले. तेथे मुलींचे कपडे, 700 ते 800 फोटो असलेला अल्बम, सँडल अशा वस्तू दिसून आल्या. या केंद्रात सारेच संशयास्पद असून तक्रारींची पोलिस अधीक्षकांनी दखल घ्यावी, अशी मागणी केली. त्यांनी अतिरिक्त अधीक्षक शशिकांत बोराटे यांना कारवाई करण्याविषयी विनंती केली.