Sat, Apr 20, 2019 07:58होमपेज › Sangli › गुरे राखणाराही मंत्रिपदावर : रघुनाथ पाटील

गुरे राखणाराही मंत्रिपदावर : रघुनाथ पाटील

Published On: Mar 24 2018 1:54AM | Last Updated: Mar 23 2018 11:39PMइस्लामपूर : शहर वार्ताहर

शेतकरी चळवळ वाढणार नाही याची खबरदारी भाजपने घेतली आहे. त्यामुळेच ज्यांना आम्ही शहाणपण शिकविले ‘त्या’ तिघांना राज्यमंत्रीपद मिळाले. नाही तर त्यांच्याकडे काय अक्कल आहे? गुरे राखणाराही आज मंत्रीपदावर आहे, अशी  टीका शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ पाटील यांनी केली.येथील राजारामबापू नाट्यगृहात शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीच्या  शहीद अभिवादन व शेतकरी जागृती यात्रेच्या प्रारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी स्वातंत्र्य युध्दातील शहिदांना अभिवादन करण्यात आले. 

पाटील म्हणाले, काही कार्यकर्ते संघटनेचे बिल्ले लावून मोठे झाले. शेतकरी चळवळीत फूट पाडण्यासाठी पाशा  पटेल, रविकांत तुपकर, सदाभाऊ खोत यांना पदे दिली. भाजपकडे त्यांच्यापेक्षा हुशार लोक आहेत. मात्र शेतकरी चळवळीतील कार्यकर्त्यांना मंत्रीपद देऊन चळवळ थांबविण्याचा प्रयत्न भाजपने केला आहे. आमच्याकडे आता कार्यकर्त्यांची कमी नाही. आम्ही धडाडीचे नवे कार्यकर्ते तयार करू.
ते म्हणाले, शेतीमालाचे भाव पाडले जात आहेत. जागतिक बाजारपेठेत शेतीमालाला चढा दर असला तरी निर्यातबंदीमुळेच शेतीमाल बाहेर  जात नाही.  शेतकरी शासनाच्या धोरणांचा बळी पडतो आहे. शेतकर्‍यांच्या आत्महत्त्या म्हणजे सरकारने घेतलेले बळीच आहेत. 

कन्हैय्यालाल सिहारा (राजस्थान) म्हणाले, मोदी सरकारच्या काळात काश्मीरमध्ये सर्वाधिक  जवान शहीद झाले आहेत. त्यापैकी बहुसंख्य जवान शेतकरी कुटुंबातील आहेत. सरकारकडून जातीय तेढ वाढविली जात आहे. बँकेत घोटाळे करून लुटले जात आहे.  सत्यशोधक शेतकरी सभेचे किशोर ढमाले, संघर्ष समितीच्या सुशीलाताई मोराळे, प्रतिभा शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. किसान सभेचे नामदेवराव गावडे, गणेश जगताप, कालिदास आपेट, शिवाजीराव नांदखिले, शंकरराव गायकवाड उपस्थित होते.

Tags : Sangli, Sangli News, unqualified persons, get ministry, state, Raghunath Patil