Sat, Jul 20, 2019 15:27होमपेज › Sangli › सांगली : अनोख्या बंधाऱ्याचा पहिला यशस्वी प्रयोग (Video)

सांगली : अनोख्या बंधाऱ्याचा पहिला यशस्वी प्रयोग (Video)

Published On: May 26 2018 7:59PM | Last Updated: May 26 2018 7:59PMविटा : विजय लाळे 

राज्यातला अनोख्या बंधाऱ्याचा पहिला यशस्वी प्रयोग येरळेची उपनदी असलेल्या रेवण गंगा नदीवर सांगली जिल्ह्यात साकारला आहे.  राज्यातला पहिला के टी  वेअर  ( अर्थात कोल्हापूर पध्दतीचा बंधारा ) अधिक सी एन बी (म्हणजे सिमेंट बंधारा) असा अनोनखा यशस्वी प्रयोग मंगरूळ (ता खानापूर) येथे करण्यात आला आहे. मागच्या आठवड्यात सोडण्यात आलेल्या टेंभू योजनेच्या पाण्याने हा बंधारा पूर्णपणे भरलेला आहे. 

सांगली जिल्ह्यातील मंगरूळ (ता. खानापूर) येथे हा आगळा वेगळा प्रयोग करण्यात आलेला आहे. खानापूर तालुक्यातील तीर्थक्षेत्र श्री रेवण सिद्धाचे डोंगर या परिसरातून उगम पावलेली रेवणगंगा नदी ही एकूण २० ते २२ किलो मीटर लांबीची नदी आहे. ही नदी पावसाळ्याचे चार दोन आठवडे सोडले तर कायम कोरडीच असते. या नदीला वाहते करण्यासंदर्भात अनेकांनी अनेक पर्याय सुचविले होते. परंतु त्यात आजवर यश आलेले नव्हते. त्यासाठी पावसाच्या पाण्याबरोबरच बाहेरून कोणत्यातरी योजनेचे पाणी आणणे आवश्यक होते.

मंगरुळचे ग्रामस्थ आणि ज्येष्ठ नेते रामराव दादा पाटील यांनी आळसंद येथील तलावाजवळून ताकारी योजनेचे पाणी उताराने या नदीत येऊ शकते असा पर्याय सुचवला होता. परंतु राजकीय इच्छाशक्ती अभावी तो फलद्रुप होऊ शकला नाही. आमदार अनिलराव बाबर यांनी आपली राजकीय ताकद पणाला लावून टेंभू योजनेचे पाणी माहुली पंप गृहातून निघणार्‍या खानापूर तासगाव कालव्याद्वारे नदीपर्यंत आणले आहे. पारे गावाजवळ टेंभू योजनेच्या कालव्यातून पाणी या नदीत सोडले आहे. 

रेवणगंगा नदीला रेवणगाव, तामखडी, घोटी खुर्द तसेच रेणावीची पूर्व बाजू असे पाणलोट आहे. या पाणलोटातच पारे तलाव आहे. पारे तलावातून पुढे पारेगाव, चिंचणी, मंगरूळ, तासगाव तालुक्यातील लिंब, बोरगाव मार्गे राजापूर जवळ ही नदी पुढे येरळेला मिळते. मंगरूळ येथे हा के टी  वेअर आणि सी एन बी असा हा अनोखा बंधारा बांधलेला आहे. 

राज्यात अनेक ठिकाणी के टी वेअर्स, सिमेंट बंधारे बांधले जातात. परंतु या ठिकाणी बंधारा सिमेंटचा आहे तर मध्ये के टी वेअर प्रमाणे बंधार्‍यास दोन लोखंडी दरवाजे केलेले आहेत. बाकी सर्व बांधकाम सिमेंट बंधाऱ्या प्रमाणेच वर १ मीटर आणि खाली ४ मीटर रुंदीचे आहे. बंधाऱ्याची एकूण लांबी ४० मीटर तर खोली ४ मीटर इतकी आहे. त्यामुळे मागे १ किलोमीटर पर्यंत पाणी साठा झालेला आहे, असे कंत्राटदार विलास पाटील यांनी सांगितले. दरम्यान, पहिल्यांदाच टेंभूचे पाणी आल्याने गाव आणि परिसरात लोकांतून आनंद व्यक्त होत आहे.

 

Tags : sangali, revanganga, KT Ware, kolhapur type dam, kolhapur type dam, CNB