Thu, Aug 22, 2019 10:12होमपेज › Sangli › खूनप्रकरणी पुतण्यासह दोघांना अटक

खूनप्रकरणी पुतण्यासह दोघांना अटक

Published On: Apr 20 2018 1:18AM | Last Updated: Apr 20 2018 1:18AMसांगली : प्रतिनिधी

  येथील आपटा पोलिस चौकीजवळील हितेश जयंतीलाल पारेख (वय 45) यांचा डोक्यात हातोडा घालून खून केल्याप्रकरणी त्यांचा पुतण्या सूरज अतुल पारेख (वय 23) आणि सूरजचा मित्र सौरभ रवींद्र कुकडे (वय 19, वाल्मीकी आवास, जुना बुधगाव रस्ता) या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.  दोघांना  दहा दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. 

 हितेश पारेख यांनी सूरजला घरातून बाहेर काढले होते. खर्चासाठी ते पैसेही देत नव्हते. त्यामुळे सूरजने सौरभच्या मदतीने पारेख यांचा काटा काढल्याचे पोलिस तपासात पुढे आले  आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी पत्रकारांना दिली. 

मंगळवारी रात्री हितेश पारेख व त्यांची आई कमल पारेख (वय 81) यांच्या डोक्यात हातोडा घालण्यात आला होता. दुसर्‍यादिवशी (बुधवारी) सकाळी दहा वाजता हा प्रकार उघडकीस आला होता. कमल पारेख या बेशुद्ध होत्या, तर हितेश मरण पावले होते. कमल यांना तातडीने उपचारासाठी हलविण्यात आले. त्यांचा सायंकाळी जबाब नोंदवून घेतला.  त्यांनी दिलेल्या माहितीमुळे पोलिसांनी सूरजला रात्रीच ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखविताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. सूरज लहान असतानाच त्याच्या आई-वडिलांचे निधन झाले होते. तेव्हापासून सूरज व त्याच्या बहिणीचा हितेश पारेख यांनी सांभाळ केला होता.   सूरज हा त्याची आजी कमल पारेख यांच्याकडे  राहत होता.

तो काहीच कामधंदा करीत नसे. व्यसनाच्या आहारी गेला होता. मित्रांकडून ऊसने पैसे घेत असे. पैशावरुन त्याचे अनेकांशी भांडण झाले होते. ही भांडणे घरापर्यंत येत होती. त्यामुळे हितेश पारेख यांनी सूरजला अनेकदा खडसावले होते. तुझ्या वर्तणुकीत सुधारणा नाही झाली तर, तुला घरातून बाहेर काढणार, असे त्यांनी सांगितले होते. तरीही सूरजच्या वर्तणुकीत बदल झाला नाही. त्यामुळे हितेश पारेख यांनी सूरजला घरातून बाहेर काढले. त्याचा सूरजला राग आला होता. 

आता रहायचे कुठे, असा त्याला प्रश्‍न पडला.  यातून त्याने मित्र सौरभ कुकडे याची मदत  घेतली. दोघांनी मिळून हितेश यांना मारण्याचा प्लॅन केला. त्यानुसार त्यांचा खून केला. त्यावेळी  आजी कमल पुढे आल्यानंतर त्यांच्याही डोक्यात हातोडा  घातला.

दरम्यान, सूरजच्या विरोधात यापूर्वीच मिरज पोलिस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल आहे. खुनी हल्ला केल्यानंतर हितेश यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने लंपास झाले असून ते या दोघांनी चोरले असावेत, असा पोलिसांचा संशय आहे. या गुन्ह्याचा तपास विश्रामबाग पोलिस ठाण्यातील गणेश पाटील, रविंद्र आवळे, वसंत किर्वे, अमोल ढोले यांनी केला. पोलिस अधीक्षक शर्मा यांनी या पथकास बक्षीस जाहीर केले आहे. 

 अपार्टमेंटमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसावावेत ः शर्मा

चोरी, खुनी हल्ला या सारखे प्रकार रोखण्यासाठी नागरिकांनी अपार्टमेंटमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. रखवालदारांची नियुक्‍ती करावी, असे आवाहन पोलिस अधीक्षक  शर्मा यांनी केले आहे.