Fri, Aug 23, 2019 23:13होमपेज › Sangli › सांगलीत मलनिस्सारण केंद्रात बुडून दोघांचा मृत्यू

सांगलीत मलनिस्सारण केंद्रात बुडून दोघांचा मृत्यू

Published On: May 27 2018 1:22AM | Last Updated: May 26 2018 11:57PMसांगली : प्रतिनिधी

येथील भारतभीम जोतिरामदादा पाटील मलनिस्सारण केंद्रात पडून विठ्ठल शामलिंग शेरेकर (वय 45, रा. हनुमाननगर) आणि अभियंता उमाकांत प्रभाकर देशपांडे (वय 50, रा. गणेशनगर, दोघे रा. सांगली)  या दोघांचा मृत्यू झाला. दुरुस्तीचे  काम सुरू असताना गॅस दुर्गंधीमुळे चक्‍कर येऊन ते इंटकवेलमध्ये पडले आणि सांडपाण्यात बुडाले. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. शनिवारी दुपारी साडेचार वाजता ही दुर्घटना घडली.

दोघांना वाचवताना जयंत रमाकांत कोथमिरे (वय 30, रा. कोगे, ता. करवीर, जि. कोल्हापूर) व संजय सदाशिव माळी (वय 24, रा. कवलापूर) हे दोघेजण गुदरमले होते. मात्र, सुदैवाने कुस्ती आखाड्यात असणार्‍या पैलवानांनी धाव घेत त्यांना वाचवले. हे सर्वजण केंद्राचे दुरुस्तीकाम करीत असलेल्या अ‍ॅक्‍वाटेक सोल्युशन प्रा. लि.( पुणे) या ठेकेदार कंपनीचे कर्मचारी आहेत. 

महापौर हारुण शिकलगार, आयुक्‍त रवींद्र खेबुडकर, पाणीपुरवठा व मलनिस्सारण विभागाचे कार्यकारी अभियंता शीतल उपाध्ये, काँगे्रसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संजय कवठेकर, शिवसेनेचे नगरसेवक शेखर माने, नगरसेवक संतोष पाटील, राजेश नाईक, अमर निंबाळकर तातडीने घटनास्थळी पोहोचले. अग्‍निशमन विभागाचे प्रभारी मुख्य अधिकारी देसाई यांच्यासह पथकाने युद्धपातळीवर मदतकार्य व बचाव मोहीम राबविली. दोन कर्मचार्‍यांनी  केंद्रात उतरून बुडालेल्यांचे मृतदेह बाहेर काढले. सांगली, मिरजेत ड्रेनेज योजनेंतर्गत सांगलीत ठेकेदार कंपनीमार्फत या मलनि:स्सारण केंद्राच्या दुरुस्तीचे काम  चार-साडेचार वर्षे  सुरू आहे. आता हे काम अंतिम टप्प्यात आले आहे.  सध्या इंटकवेलमधील जाळी बदलण्याचे काम सुरू होते. 

गॅसमुळे चक्कर

विठ्ठल शेरेकर, उमाकांत देशपंडे, अनिकेत कोथमिरे, संजय माळी आदींसह काही कर्मचारी काम करीत होते.  दुपारी  या  केंद्रातील  सांडपाणी  शुद्ध करणार्‍या इंटकवेलमध्ये पाणीपातळी पाहण्यासाठी शेेरेकर गेले होते. शिडीच्या तीन-चार पायर्‍या ते  उतरले होते. परंतु सांडपाण्याने तयार झालेल्या गॅसमुळे त्यांना चक्कर आली. ते खाली कोसळत असल्याचे पाहून जवळच असलेले  देशपांडे  शेरेकर यांना वाचविण्यासाठी पुढे धावले. 

परंतु गॅसमुळे देशपांडे यांनाही चक्कर आली. ते दोघेही इंटकवेलमध्ये कोसळले. तो आवाज ऐकून जयंत कोथमिरे व संजय माळी तेथे धावले. त्यांनी त्या दोघांना वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतु गॅसमुळे तेही भोवळ  येऊन  खाली कोसळले.  आरडाओरडा ऐकून कुस्ती केंद्रातील  काही पैलवान व नागरिक त्या ठिकाणी मदतीसाठी धावले. त्यांनी माळी व कोथमिरे यांना वाचविले. परंतु देशपांडे व शेरेकर मात्र सांडपाण्यात 25 ते 30 फूट खोल  बुडाल्याने त्यांचा मृत्यू झाला होता.

अग्निशमन विभागाच्या कर्मचार्‍यांनी इंटकवेलमधून देशपांडे आणि शेरेकर यांना बाहेर काढले. परंतु रुग्णवाहिकेसोबत असलेल्या डॉक्टरांनी त्या दोघांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. जखमी कोथमिरे व माळी यांना वसंतदादा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.   शहर पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.