Mon, Apr 22, 2019 16:14होमपेज › Sangli › जिल्ह्यात दोन लाख वाहने वाढली

जिल्ह्यात दोन लाख वाहने वाढली

Published On: May 24 2018 1:22AM | Last Updated: May 23 2018 9:03PMसांगली : अभिजित बसुगडे

जिल्ह्यात गेल्या दोन वर्षात सुमारे दोन लाख वाहने वाढल्याचे चित्र आहे.  पेट्रोल, डिझेल दरवाढ होऊनही वाहनांच्या खरेदीत वाढच होताना आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. नवीन वाहन खरेदीबरोबरच परजिल्हे तसेच परराज्यातून खरेदी केल्या जाणार्‍या जुन्या वाहनांच्या संख्येतही वाढ झाली आहे. 

गेल्या पाच वर्षात दरवर्षी सरासरी 75 हजार वाहने अन्य जिल्हे तसेच परराज्यातून खरेदी केल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. 2010 मध्ये जिल्ह्यात सर्व प्रकारची मिळून 4 लाख 10 हजार वाहने होती. 2011 मध्ये त्यामध्ये 59 हजार नवीन वाहनांची भर पडली. 2012 मध्ये वाहनांची संख्या 5 लाख 20 हजारांपर्यंत पोहोचली होती. 2013 मध्ये यामध्ये 52 हजारांनी वाढ झाली.  2014 मध्ये जिल्ह्यातील वाहनांची संख्या 6 लाख 27 हजारांवर पोहोचली.  2015 मध्ये सर्व प्रकारची मिळून 6 लाख 79 हजार वाहनांची नोंद उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे झाली होती. 31 मार्च 2017 पर्यंत ही संख्या 7 लाख 89 हजारांवर पोहोचली. तर एप्रिल 2018 अखेर जिल्ह्यात 8 लाख 62 हजार, 280 वाहने रस्त्यावर आहेत. 

प्रति तीन माणसांमागे एक वाहन...

सन 2011 च्या जनगणनेनुसार जिल्ह्याची लोकसंख्या 28 लाख 20 हजार 575 इतकी आहे. तर आरटीओ कार्यालयाकडे एप्रिलअखेर नोंद असलेल्या वाहनांची संख्या 8 लाख 62 हजार 280 इतकी आहे. या आकडेवारीवरून जिल्ह्यातील प्रती तीन माणसांमागे एक वाहन असल्याचे स्पष्ट होत आहे. इंधन दरात गेल्या दोन वर्षात कमालीची वाढ होऊनही वाहनांची संख्या वाढत असल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. शिवाय वाढत्या वाहनांचा शहरी भागातील वाहतुकीवरही परिणाम होताना दिसून येत आहे.