Thu, May 23, 2019 21:23
    ब्रेकिंग    होमपेज › Sangli › आठ जिल्हा बँका दोन दिवसात ‘सर्वोच्च’मध्ये

आठ जिल्हा बँका दोन दिवसात ‘सर्वोच्च’मध्ये

Published On: Feb 27 2018 1:57AM | Last Updated: Feb 26 2018 11:54PMसांगली : प्रतिनिधी

सांगली, कोल्हापूर, पुणे, अहमदनगर, नाशिक, वर्धा, अमरावती, नागपूर या आठ जिल्हा बँकांकडील पाचशे, हजार रुपयांच्या रद्द नोटांचे शिल्लक 112 कोटी रुपये ‘आरबीआय’ने स्विकारावेत, यासाठी या जिल्हा बँकांतर्फे दोन दिवसात सर्वोेच्च न्यायालयात विशेष याचिका दाखल होत आहे. 

केंद्र शासनाने दि. 8 नोव्हेंबर 2016 रोजी पाचशे व हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्या. त्यानंतर आरबीआयच्या अधिसुचनेनुसार जिल्हा बँकांनी ग्राहकांकडून पाचशे, हजाराच्या नोटा स्विकारल्या. राज्यात जिल्हा बँकांकडे 2 हजार 771 कोटी रुपये जमा झाले होते. दि. 10 ते 13 नोव्हेंबर 2016 या कालावधीत जमा झालेल्या नोटा आरबीआयने स्विकारल्या. मात्र जिल्हा बँकांकडे दि. 8 नोव्हेंबर रोजी व त्यापूर्वी असलेल्या पाचशे, हजाराच्या नोटा स्विकारण्यास मनाई केली. सांगलीसह 8 जिल्हा बँकांकडे ही रक्कम 112 कोटी रुपये आहे. ही रक्कम आरबीआयने स्विकारावी यासाठी जिल्हा बँका सर्वोच्च न्यायालयात विशेष याचिका दाखल करत आहेत. 

‘ती’ रक्कम ‘सीआरआर’ची

एकूण ठेवींच्या 4 टक्के रक्कम सीआरआर (कॅश रिझर्व्ह रेशो) स्वरुपात बँकेकडे कॅश इन हॅण्ड ठेवावी लागते. त्यानुसार सांगली जिल्हा बँकेत 120 कोटी रुपये ‘सीआरआर’ स्वरुपात होते. त्यामध्ये पाचशे, हजार रुपयांच्या नोटांचे 66.72 कोटी रुपये होते. त्यापैकी दि. 10 ते 14 नोव्हेंबर 2016 या कालावधीत रिझर्व्ह बँकेच्या करन्सी चेस्टनी 52 कोटी रुपये स्विकारले. आता 14.72 कोटी रुपये शिल्लक आहेत. रिझर्व्ह बँकेने ग्राहकांकडील पाचशे, हजार रुपयांच्या नोटा स्विकारल्या. मात्र जिल्हा बँकेकडे  ‘सीआरआर’साठी कॅश इन हॅण्ड स्वरुपात ठेवणे बंधनकारक असलेल्या रकमेतील पाचशे, हजाराच्या नोटा स्विकारल्या जात नाहीत, हे दुर्देवी आहे, असे बँकेतून सांगण्यात आले.