Tue, Sep 25, 2018 05:23



होमपेज › Sangli › संशयित लोकेश नाईकसह दोघे गायबच

संशयित लोकेश नाईकसह दोघे गायबच

Published On: Feb 03 2018 2:15AM | Last Updated: Feb 02 2018 11:23PM



सांगली ः प्रतिनिधी

येथील शास्त्री चौकात झालेल्या सुनील आंबी या शिक्षकांच्या खूनप्रकरणातील संशयित लोकेश नाईकसह दोघेजण अद्यापही गायबच आहेत. दरम्यान, खून होऊन एक महिन्याचा कालावधी लोटला तरी अद्यापही दोन संशयितांना अटक करण्यात आली नाही. पोलिसांचा तपास संथ गतीने सुरू असल्यामुळे नागरिकांतून नाराजी व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत चौघांना अटक केली आहे.  

आतापर्यंत गुंड रवि खत्री, हॉटेल डायमंडचा वेटर राकेश चव्हाण, सुहास उर्फ तम्मा ऐवळे, प्रदीप मोरे यांना अटक करण्यात आली आहे. या चौघांचीही न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. सुनील आंबी हे विश्रामबाग येथील एका शाळेत शिक्षक होते. संशयित प्रमोद मोरे याने पत्नीला आंबी हे त्रास देत  असल्याने खून केल्याची कबुली पोलिस तपासात दिली होती. खुनाचा गुन्हा दाखल झाल्यापासून मोरे यांची पत्नी बेपत्ता होती. मात्र गेल्या आठवड्यात पोलिसांनी त्यांच्याकडे कसून चौकशी केली.  

दि. 26 डिसेंबररोजी रात्री साडेअकराच्या सुमारास सुनील आंबी यांना  मोबाईलवर फोन करून चर्चा करायचे असल्याचे सांगून शास्त्री चौकात बोलावून घेतले. तेथे आल्यानंतर संशयितांनी त्यांना बेदम मारहाण केली. यामध्ये ते गंभीर जखमी होऊन बेशुद्ध झाल्यानंतर  नाईकच्या कारमध्ये त्यांना घालून शंभर फुटी रस्ता परिसरात जखमी अवस्थेत सोडून देण्यात आले.  त्यानंतर त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचार सुरू असताना दि. 4  जानेवारी रोजी त्यांचा मृत्यू झाला. संशयितांवर खुनासह दरोडा आणि चोरीचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.