Sun, Mar 24, 2019 04:50होमपेज › Sangli › विजेच्या धक्क्याने सासरा-सुनेचा मृत्यू

विजेच्या धक्क्याने सासरा-सुनेचा मृत्यू

Published On: Jun 26 2018 1:16AM | Last Updated: Jun 25 2018 11:01PMलिंगनूर : वार्ताहर 

लिंगनूर (ता. मिरज) येथील कुडचे मळ्यातील बसगोंडा शिवगोंडा कुडचे ( वय 75) आणि त्यांची सून विद्या भैराप्पा कुडचे (वय 30) यांचा विजेचा धक्का लागून सोमवारी सकाळी मृत्यू झाला.

सकाळी विद्या यांनी कपडे धुवून घराबाहेर वाळत घातले होते. पावसाची सर आल्याने तेच कपडे घेऊन त्या घराशेजारी असणार्‍या पत्र्याच्या शेडमध्ये गेल्या. या शेडमध्ये घरातून वीज कनेक्शन घेतले आहे. त्या वायरचे प्लास्टिक कोटिंग निघाल्याने संपूर्ण शेड शॉर्ट सर्किटने विद्युतभारित झाले असावे, असा अंदाज आहे. त्यामुळे तेथील कपडे वाळत घालण्यासाठी बांधलेल्या तारेतही विद्युतप्रवाह खेळत  होता. त्या तारेवर कपडे वाळत घालत असताना विजेचा जोरदार धक्का बसल्याने विद्या या बाजूला फेकल्या गेल्या. 

धक्का अत्यंत जोराचा असल्याने त्या बेशुद्ध  झाल्या होत्या. त्या  ओरडल्यामुळे घरातील व शेजारचे लोक  घटनास्थळी धावत गेले. विद्या या बेशुद्ध पडल्यामुळे कोणालाही त्यांना विजेचा धक्का बसल्याची कल्पना आली नाही.  त्यांना त्यांचे पती भैराप्पा  गाडीमधून उपचारासाठी सांगलीकडे  घेऊन जात होते;  मात्र त्यांचा वाटेतच मृत्यू झाला. 

दरम्यान   विद्या यांचे  सासरे बसगोंडा कुडचे  शेडमध्ये गेले होते. नेमके काय झाले याची  पाहणी करीत असतानाच  त्यांनाही विजेचा धक्का बसला. कारण  शेड आणि सर्व तारा शॉर्ट होऊन विद्युत प्रवाहित झाल्या आहेत याची कल्पना त्यांनाही नव्हती.  त्यांचाही  हात कपडे वाळत घालण्यासाठी बांधलेल्या तारेस लागल्याने त्यांनाही विजेचा जोरदार धक्का बसला.  त्यांचा जागीच मृत्यू झाला. 

जमलेल्या लोकांना बसगोंडा कुडचे यांना विजेचा धक्का लागल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्यांनी  वाळलेल्या लाकडाने त्यांना तारेपासून व शेडपासून बाजूला केले.  गावातील विद्युत उपकेंद्रात माहिती देऊन भागातील वीजपुरवठा बंद करावयला लावला. नंतर महावितरणचे कर्मचारी घटनास्थळी आले.विद्या आणि भैराप्पा या दाम्पत्यास दोन मुली आणि एक मुलगा आहे. मुलगा तिसरीत असून दोन मुली अंगणवाडीत आहेत.  मिरज ग्रामीण पोलिस ठाण्याचे निरीक्षक मोहन जाधव,तसेच पोलिस पाटील मल्लय्या स्वामी यांनी घटनास्थळी पंचनामा केला.