Sat, Jan 19, 2019 03:27होमपेज › Sangli › अतिरिक्त शिक्षकांची बदली अटळ

अतिरिक्त शिक्षकांची बदली अटळ

Published On: Apr 20 2018 1:18AM | Last Updated: Apr 19 2018 10:50PMसांगली ः प्रतिनिधी

प्राथमिक शाळांच्या सन 2017-18 च्या संचमान्यतेत अतिरिक्त झालेल्या मुख्याध्यापक, पदवीधर शिक्षक व शिक्षकांना जिल्हांतर्गत बदलीमध्ये विशेष संवर्ग भाग-1 मध्ये फॉर्म भरताना बदली नको हा पर्याय निवडता येणार नाही. ‘संवर्ग-1’ची सूट त्यांना मिळणार नाही. संबंधित अतिरिक्तांची बदली ही अटळ असणार आहे. ग्रामविकास विभागाचे तसे पत्र जिल्हा परिषदेला प्राप्त झाले आहे. 

53 वर्षावरील शिक्षक, गंभीर आजार असलेले शिक्षक, अपंग, विधवा, परित्यक्ता, अपंग पाल्यांचे पालक यांना आंतरजिल्हा बदलीमध्ये विशेष संवर्ग-1 अंतर्गत बदली नकोचा पर्याय निवडता येतो. मात्र अतिरिक्त शिक्षकांना हा पर्याय निवडता येणार नाही. 

संचमान्यतेमुळे संबंधित शिक्षक त्या शाळेत अतिरिक्त झालेले असतात. त्यांचे वेतन त्या शाळेतून अदा केले जाणार नाही. त्यामुळे अतिरिक्त झालेल्या शिक्षकांना आंतरजिल्हा बदलीमध्ये बदली नको हा पर्याय विशेष संवर्ग-1 मध्ये फॉर्म भरताना निवडता येणार नाही, असे ग्रामविकास विभागाने स्पष्ट केले आहे. अतिरिक्त मुख्याध्यापक, पदवीधर शिक्षक व प्राथमिक शिक्षकांच्या जोडीदाराने संवर्ग-2 अंतर्गत (पती-पत्नी एकत्रिकरण) फॉर्म  भरू नये, अशा सुचना ग्रामविकास विभागाकडून जिल्हा परिषदांना दिलेल्या आहेत. परंतू असे असले तरीदेखील काही अतिरिक्त मुख्याध्यापक, पदवीधर शिक्षक व शिक्षकांच्या जोडीदाराने संवर्ग-2  अंतर्गत फॉर्म भरलेला असेल तर अशा शिक्षकांनादेखील आपल्या अर्जाची प्रत मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तात्काळ सुपूर्द करण्याबाबत सुचना देण्यात आल्या आहेत.