Tue, Apr 23, 2019 09:35होमपेज › Sangli › शंभरफुटीनेच फुटेल वाहतुकीची कोंडी

शंभरफुटीनेच फुटेल वाहतुकीची कोंडी

Published On: Feb 06 2018 1:49AM | Last Updated: Feb 05 2018 9:20PMसांगली : प्रतिनिधी

सांगलीच्या वाहतुकीची कोंडी फोडणारा शंभरफुटी हा महामार्ग आहे.  पण दुर्दैवाने महापालिकेच्या अनास्थेने वर्षानुवर्षे गॅरेजसह विविध अतिक्रमणांनी तो रस्ता 70 फुटाहून अधिक गायबच केला आहे. केवळ 25-30 फूट कसाबसा वापरात आहे. मध्यवर्ती धोकादायक विद्युतखांब आणि जोडीला खड्ड्यांत अडकलेला रस्ता याचे अतिक्रमणाला संरक्षणच दिले आहे. या अतिक्रमणांचा कायमचा बंदोबस्त करून तो रस्ता दर्जेदारपणे वापरात आला तर सर्वच अवजड वाहतूक शहरात नेण्याची गरज नाही. त्यादृष्टीने धोरणात्मक निर्णय आणि अंमलबजावणीची गरज आहे.

वाहतुकीच्या कोंडीत अडकलेल्या सांगलीचा श्‍वास मोकळा करण्यासाठी जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांनी बैठक बोलावली आहे. पण दुर्दैवाने यापूर्वी वाहतुकीच्या नियोजनाच्या बैठका, चर्चेचे गुर्‍हाळ अनेकवेळा झाले. त्यावर तोडगा, अंमलबजावणी झालेली नाही. यावेळेस किमान जिल्हाधिकारी पाटील यांनी काही महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन नव्हे तर महापालिका, पोलिस प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत ते अंमलात आणणे गरजेचे आहे. 

दुरवस्थेने अतिक्रमणाला बळच

प्रामुख्याने पार्किंगबरोबरच शहरातील अवजड वाहतुकीची डोकेदुखी आहे. दत्त-मारुती रस्ता,  हरभट रोड, गणपती पेठ-बुरुड गल्ली रस्ता, मनपा ते राजवाडा चौक या सर्वच ठिकाणी अशा अवजड वाहनांमुळे सदोदित वाहतुकीची कोंडी असते. त्यात अरुंद रस्ते त्यात दुतर्फा पार्किंग आणि त्यात ट्रकसह अवजड वाहने, एसटी आदींची भर पडते. त्यासाठी रस्त्यांचेच नियोजन करणे आवश्यक आहे. यात प्रामुख्याने सांगलीतील 100 फुटी रस्त्याबाबत स्वतंत्र मोहीम राबविणे गरजेचे आहे. कोल्हापूर रस्तामार्गे येणारी किंवा तिकडे जाण्यासाठी शहरात येणारी वाहतूकच ही मोठ्या प्रमाणात आहे. वास्तविक ती शहरात येणे टाळणे शक्यही आहे. त्यासाठी कोल्हापूर रस्ता ते वालचंद महाविद्यालय हा राजर्षी शाहूमहाराज रस्ता (100 फुटी रस्ता) गेल्या तीन दशकांहून अधिक काळ अस्तित्वात आहे. त्या रस्त्यावर कायदेशीर कोणतेच अतिक्रमणही नाही. पण दुर्दैवाने महापालिकेच्या एकाही आयुक्‍त वा अधिकार्‍यांनी गांभीर्याने न पाहिल्याने गॅरेज, पार्किंगसह हातगाड्यांसह विविध अतिक्रमणांचा विळखा आहे, तो वाढतच आहे. 

 दहाकोटींचा खुर्दा, तरीही खड्डेच

या रस्त्यावर ड्रेनेजसह विविध प्रकारच्या कामांसाठी रस्तेखोदाईचा सपाटा सुरूच आहे. त्यामुळे खड्ड्यांचे साम्राज्य बारमाही आहे. वास्तविक या रस्त्याच्या डांबरीकरणासाठी गेल्या अनेक वर्षांत 10 कोटी रुपयांहून अधिक निधी खर्च झाला आहे. पण हा रस्ता कधीच खड्डेमुक्‍त होऊ शकला नाही. त्यावर लटकणारे धोकादायक विद्युतखांब तर यात भरच आहेत. या अतिक्रमणांचा विळखा वारंवार चर्चेत आला. पण मनपा प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनीही या गॅरेजसह विविध अतिक्रमणांना कारवाई न करण्यासाठी संरक्षण दिल्याचे दिसून येते. शहरातील शंभरफुटीमार्गे शहरातील सर्वच रस्ते जोडले जातात. ते शहराची 50 टक्केहून अधिक वाहतुकीची कोंडी फोडू शकतात. तरीही याबाबत कोणालाच गांभीर्य नाही. त्यामुळे ही अनास्थाच शहरात कोंडी करणारी ठरली आहे. त्यावर आता या बैठकीच्या निमित्ताने निर्णय होणे गरजेचे आहे. 

    कोल्हापूर रस्त्यावरूनच बंदी

शहरात अनावश्यक अवजड वाहतूक शिरते. त्याला रोख लावणे गरजेचे आहे. हा शंभरफुटी रस्ता झाल्यास कोल्हापूर रस्ता चौकातूनच अवजड वाहतूक शहरात बंदी करायला हवी. ती वाहतूक या 100 फुटी रस्ता पूर्ण क्षमतेने वापरात आणून वळवावी.  त्याद्वारे मार्केट यार्ड, विश्रामबाग, मिरज, कुपवाड, माधवनगर मार्गे वळू शकते. त्या मार्गाने येणारी वाहतूकही शहरात कर्मवीर भाऊराव चौक, काँग्रेस कमिटी-सिव्हिल चौक मार्गे शंभरफुटी रस्त्याकडे वळवायला हवी. 

  सिव्हिल-बसस्थानक एकेरी रस्ता

एसटी बसेससाठी मात्र सिव्हिल चौक ते मध्यवर्ती बसस्थानक हा बसस्थानकाकडे येण्यासाठी एकेरी मार्ग करावा. त्या मार्गाने माधवनगर मार्गे येणार्‍या एसटी बसेस काँग्रेस कमिटीमार्गे सिव्हिल चौकापर्यंत याव्यात. मिरजमार्गे येणार्‍या बसेस राममंदिर चौकातूनच सिव्हिलमार्गे एसटी बसस्थानकाकडे वळवाव्यात. 

    एसटी बसेसही 100 फुटीमार्गेच

ज्या सांगली डेपो किंवा अन्य डेपोतून सांगली बसस्थानकात येऊन बाहेर पडतात, त्या शास्त्री चौक किंवा झुलेलाल चौक-पत्रकारनगर मार्गे बाहेर जाव्यात. आयर्विन पुलामार्गे अवजड वाहतूक बंद आहे. त्यामुळे ती बायपास पुलामार्गेच जाते. फक्‍त ती शहरात कर्नाळ चौकीमार्गे न नेता शंभरफुटी सिव्हिल-काँग्रेस कमिटीमार्गेच न्यावी. मिरजमार्गे जाणार्‍या सर्वच एसटी बसेस 100 फुटीमार्गेच बाहेर जाव्यात. अन्य सिव्हिल, राममंदिर चौक मार्गे मिरजेकडे जावू शकतात. तशाच पद्धतीने माधवनगरमार्गे जाणार्‍या बसेस काँग्रेस कमिटी-कॉलेज कॉर्नरमार्गे बाहेर जावू शकतात. यादृष्टीने नियोजन करणे आवश्यक
 आहे. 

   शहरी बसेसपुरता मार्ग मोकळा

शहरात ये-जा करणार्‍या शहरी बसेसच्या फेर्‍या त्या तुलनेत कमी आहेत. त्यातील प्रवाशांना शहरात थांबा आवश्यक असतो. त्यामुळे त्या बसेस फक्‍त शहरातून येऊ 
द्याव्यात.