Tue, May 21, 2019 04:05होमपेज › Sangli › व्यापार्‍यासह तिघांना एक्स्प्रेसमध्ये लुटले

व्यापार्‍यासह तिघांना एक्स्प्रेसमध्ये लुटले

Published On: Jan 17 2018 2:03AM | Last Updated: Jan 16 2018 11:53PM

बुकमार्क करा
मिरज : प्रतिनिधी

म्हैसूर-अजमेर एक्स्प्रेसमधून राजस्थानमधील एका कापड व्यापार्‍यासह तिघांना कोल्ड्रिंक्समधून गुंगीचे औषध देऊन लाखो रुपयांचा ऐवज अज्ञाताने लुटल्याची घटना घडली. तिन्ही प्रवाशांची प्रकृती गंभीर असून, त्यांना मिरज येथे प्रथम शासकीय रुग्णालयात त्यानंतर खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. 

हा प्रकार कर्नाटकातील चित्तूर रेल्वेस्थानकादरम्यान घडला आहे. लुबाडणूक करण्यात आलेल्या प्रवाशांमध्ये राजस्थानमधील उदयपूर येथील कापड व्यापारी भवरलाल राजपुरोहित (वय 53), गंगादेवी राजपुरोहित (47) व प्रभुराम (26) यांचा समावेश आहे.

वरील तिन्ही प्रवासी म्हैसूर-अजमेर एक्स्प्रेसने बंगळूर ते फलटणदरम्यान प्रवास करीत होते. चित्तूर रेल्वेस्थानकादरम्यान एका पंचवीस वर्षाच्या तरुणाने वरील तिघांचा त्यांच्या राज्यस्थानी भाषेत संभाषण करून विश्‍वास संपादन केला. जेवणानंतर त्यांना ग्लासमधून कोल्ड्रिंक्स पिण्यास दिले. स्वत: बाटलीतून कोल्डिंक्स प्याला. तिघे बेशुद्ध झाल्यानंतर त्यांच्या बॅगेतील व अंगावरील सोन्याचे दागिने, किमती मोबाईल व रोख रक्‍कम असा लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला.

तिन्ही प्रवासी बराच वेळ बेशुद्धावस्थेत पडल्याने सहप्रवाशांनी रेल्वेच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला. नियंत्रण कक्षाच्या आदेशानुसार मंगळवारी दुपारी आरपीएफ जवानांनी त्या प्रवाशांना ताब्यात घेऊन उपचाराकरिता मिरज येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल केले. सायंकाळपर्यंत त्या प्रवाशांची प्रकृती गंभीर होती. सायंकाळनंतर या तिघांनाही शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रवासी अद्याप शुद्धीवर न आल्याने नेमका किती ऐवज लुटण्यात आला, हे मात्र समजू शकले नाही.