Tue, Jul 23, 2019 18:48होमपेज › Sangli › टोमॅटोच्या प्लॉटमध्ये सोडल्या शेळ्या

टोमॅटोच्या प्लॉटमध्ये सोडल्या शेळ्या

Published On: May 08 2018 8:20AM | Last Updated: May 08 2018 8:20AMबागणी : प्रतिनिधी

टोमॅटोच्या दरात घसरण झाल्याने काढणी देखील परवडत नसल्याने बागणी, काकाचीवाडी येथे काही शेतकर्‍यांनी उद्वेगाने टोमॅटोच्या प्लॉटमध्ये शेळ्या सोडल्या आहेत. तर अनेकांनी टोमॅटोने लगडलेले प्लॉट सोडून दिले आहेत. 

वारणा भागातील बागणीसह काकाचीवाडी येथे अनेक शेतकर्‍यांनी ताजा पैसा मिळावा यासाठी तीन-चार महिन्यांपूर्वी टोमॅटोची लागवड केली आहे. मात्र ऐन हंगामात दरात घसरण झाल्याने उत्पादक शेतकर्‍यांना चांगलाच फटका बसला आहे.  यातून अनेक शेतकर्‍यांना टोमॅटोची काढणी  देखील परवडत नसल्याचे चित्र आहे. 

काकाचीवाडी येथील प्रयोगशील शेतकरी शरद जामदार म्हणाले, सातत्याने ऊस हे एकच पीक घेत आहे. मात्र थोडा बदल म्हणून यावेळी एक एकर टोमॅटोची लागवड केली. यासाठी रासायनिक खते, औषधे, मजुरी आदींचा खर्च लाखाच्या घरात गेला. 

प्रत्यक्ष काढणी सुरू झाल्यानंतर काही काळ टोमॅटोचा दर बरा राहिला. मात्र नंतर दहा किलोेचा दर हा 40 रुपयांपर्यंत खाली आला. एका कॅरेटमध्ये 23 किलो माल बसतो. मात्र त्याची हमाली सहा टक्के, भाडे 25 रुपये आणि वटाव सहा रुपये असा खर्च येऊ लागला. तोड्याला महिला मजुरांचा खर्च आला 2000 रुपये तर  त्या तोडलेल्या टोमॅटोचा दर मिळाला 1500 रुपये!  काढणीचा खर्च देखील निघेना. सुरुवातीचा खर्च  वेगळाच! म्हणून टोमॅटोने लगडलेला प्लॉटच काढून टाकला असल्याची प्रतिक्रिया शरद जामदार आणि त्यांचे  चिरंजीव अलोक जामदार यांनी व्यक्त केली. 

दरम्यान, काकाचीवाडी येथीलच  शिवाजी ढोले म्हणाले, यावेळी एक एकर टोमॅटो केला. खर्च देखील केला, मात्र तुलनेने दर फारच कमी मिळाला. मी  नोकरदार आहे म्हणून हा तोटा सहन करू शकतो, मात्र  केवळ शेती करतो त्याला हे नुकसान परवडणार नाही. सरकारने याचा विचार करुन टोमॅटोसाठी हमीभाव बांधून देण्याची गरज आहे. दरम्यान,  दर कमी झाल्याने टोमॅटोचा प्लॉट ढोले यांनी सोडून दिला आहे. तसेच यात चरण्यासाठी शेळ्या देखील सोडल्या. भागात हा सारा प्रकार चर्चेत आला आहे.
 

Tags : tomato, rate down, farmer loss, bagani, sangali news