Fri, Jul 19, 2019 01:35होमपेज › Sangli › आजपासून नवे नगरमंडळ कार्यरत

आजपासून नवे नगरमंडळ कार्यरत

Published On: Aug 14 2018 1:06AM | Last Updated: Aug 13 2018 11:12PM सांगली : प्रतिनिधी

महापालिका निवडणुकीत सत्तांतरानंतर तत्कालीन काँग्रेस सत्तेचा कार्यकाल सोमवारी (13 ऑगस्ट) संपुष्टात आला.  आता भाजप सत्तेचा प्रारंभ झाला आहे. मंगळवारपासून (दि. 13) मनपाचे नवे सभागृह  ( नगरमंडळ) अस्तित्वात येणार आहे, कार्यरत होणार आहे.या सभागृहामध्ये भाजपचे 42 (सहयोगी सदस्यांसह) काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे  35 तर स्वाभिमानी विकास आघाडीचा एक  असे  78 नगरसेवक आहेत.  आजपासून त्यांच्या कामकाजाला प्रारंभ होईल. परंतु खर्‍या अर्थाने 20 ऑगस्टरोजी महापौर निवडीनंतरच कामकाजाला प्रारंभ होणार आहे.

आतापर्यंत महापालिकेत महाआघाडीचा कार्यकाल वगळता एकहाती काँग्रेसनेते स्व. मदन पाटील यांच्या नेतृत्वाखाली सत्ता होती. गेल्या पाच वर्षांपासून मदनभाऊ पाटील यांच्या नेतृत्वाखाली एकहाती काँग्रेसची सत्ता होती. मदन पाटील यांच्या निधनानंतर काँग्रेसमध्ये फूट पडली. राष्ट्रवादीच्या टेकूवर कशीबशी मदनभाऊ गटाची सत्ता टिकली. उपमहापौर गटाच्या माध्यमातून कारभारात कुरघोड्या सुरूच राहिल्या. 

दरम्यान, काँग्रेस-राष्ट्रवादीने भाजपला रोखण्यासाठी महापालिका निवडणुकीत आघाडी केली होती. पण भाजपने स्वबळावर प्रथमच 78 जागांवर उमेदवार उभे करून आव्हान निर्माण केले होते. परंतु भाजपने आघाडीचा पराभव करीत 41 जागांसह सत्तांतर घडविले.  अपक्ष गजानन मगदूम यांनी भाजपचे सहयोगी सदस्यत्व स्वीकारले. आघाडीचे 35 सदस्य निवडून आले. स्वाभिमानीकडून मावळते उपमहापौर विजय घाडगे एकमेव निवडून आले. 

आता भाजपकडून महापौर,उपमहापौर, गटनेता, सभागृहनेता निवडीसाठी, तर काँग्रेसकडून  विरोधी पक्षनेता, राष्ट्रवादीकडून गटनेता निवडीसाठी हालचाली सुरू आहेत. दि. 20 ऑगस्टरोजी महापौर, उपमहापौर पदासाठी निवडणूक  होत आहे. यासाठी भाजप, आघाडीकडून मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. गुरुवारी अर्जभरणा होणार आहे. सर्व नव्या उमेदवारांना अजेंडाही पाठविण्यात आला आहे. त्यानुसार आजपासून निवडून आलेल्या नवीन कार्यकारी मंडळाचे सभागृह अस्तित्वात येत आहे.