Thu, Mar 21, 2019 23:23
    ब्रेकिंग    होमपेज › Sangli › मनपा झाली श्रीमंत, 32 नगरसेवक कोट्यधीश

मनपा झाली श्रीमंत, 32 नगरसेवक कोट्यधीश

Published On: Aug 24 2018 12:47AM | Last Updated: Aug 23 2018 7:15PMसांगली : अमृत चौगुले

शहराच्या विकासासाठी जनतेने गुणात्मक मूल्यांकन करून मतदानातून 78 जणांना निवडून दिले. त्यापैकी केवळ 6 जण द्विपदवीधर आणि 21 जण पदवीधर आहेत. दोघेजण तर  निरक्षर असले तरी त्यांना नगरसेवक म्हणून विकासकामांचा अनुभव आहे. 

निवडून आलेल्यांपैकी तब्बल 32 जण कोट्यधीश आहेत. यामध्ये सर्वाधिक श्रीमंत हे मिरजेचे भाजपचे नगरसेवक गणेश माळी आहेत. त्यांची 5 कोटी 92 लाख इतकी मालमत्ता आहे. त्यांच्या पाठोपाठ अ‍ॅड. स्वाती शिंदे या श्रीमंत आहेत. त्यांची मालमत्ता 5.30 कोटींची आहे. गुन्हेगारीचेही तब्बल 14 जणांचे रेकॉर्ड आहे.

प्रभागनिहाय झालेल्या तुल्यबळ लढतीतून महापालिकेत 78 सदस्य निवडून आले. यामध्ये पहिल्यांदाच सत्तांतर घडवत भाजपने 42 सदस्यांसह (अपक्ष गजानन मगदूम सहयोगी सदस्य) बहुमत मिळविले. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला 35, तर स्वाभिमानी विकास आघाडीला विजय घाडगे यांच्यारूपाने एक जागा मिळाली. 

ही महापालिका निवडणूक पक्षनिहाय झाली तरी त्या-त्या प्रभागात जनतेने शहराच्या विकासाचे सांगाती म्हणून त्यांना निवडून दिले आहे. त्यामुळे त्यांच्याकडून दर्जेदार नागरी सुविधा आणि शहराच्या विकासाच्या संकल्पना राबवाव्यात, अशी अपेक्षा आहे.

अर्थात राज्य निवडणूक आयोगाने निर्भय आणि चांगले उमेदवार निवडून द्यावेत यासाठी निवडणुकीपूर्वी त्यांची आर्थिक, शैक्षणिक आणि गुन्हेगारी पार्श्‍वभूमीही जनतेसमोर चौका-चौकात फलकाद्वारे समोर आणली होती. यातून यामध्ये राजकीय, सामाजिक पार्श्‍वभूमीबरोबरच त्यांचे शिक्षण, संघटन, चारित्र्य, लोकसंग्रह याचाही लेखाजोखा जनतेने तपासला. त्याद्वारे जनतेने मतदानाद्वारे त्यांना संधी दिली आहे.

यामध्ये सर्वाधिक उच्चशिक्षित सर्व द्विपदवीधर (पदव्युत्तर) शिक्षित पाचही नगरसेवक हे भाजपचे आहेत. पदवीधरांमध्ये मात्र काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीवर  आहे. एकूण 23 पैकी 12 पदवीपर्यंत शिक्षण झालेले नगरसेवक हे काँग्रेस - राष्ट्रवादी आघाडीचे आहेत. तसेच दोन्ही अशिक्षित नगरसेवकही आघाडीचे (राष्ट्रवादी) आहेत. 

गुन्हे दाखल असणार्‍यांमध्येही काँग्रेस - राष्ट्रवादीची आघाडी आहे. एकूण 14 पैकी आठ गुन्हे दाखल असलेले नगरसेवक काँगे्रेस-राष्ट्रवादीचेच आहेत. त्या आठजणांवर एकूण 15 गुन्हे दाखल आहेत. भाजपही यामध्ये मागे नाही. त्यांच्या सहाजणांवरच तब्बल 12 गुन्हे दाखल आहेत. अर्थात सर्वाधिक गुन्हे दाखल असणार्‍या नगरसेवकामध्ये मात्र भाजपच्या नगरसेवकाचा क्रमांक लागतो. 

श्रीमंतीतही (मालमत्ता) भाजपचेच उमेदवार आघाडीवर आहे. एकूण 32 पैकी 19 कोट्यधीश भाजपचे, तर 13 कोट्यधीश काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे आहेत. यामध्ये सर्वाधिक श्रीमंत गणेश माळी आणि अ‍ॅड. स्वाती शिंदे हे दोघेही भाजपचेच आहेत. अर्थात शिक्षणात द्विपदवीधर असलेल्या परंतु सर्वाधिक गरीब उमेदवार सौ. सोनाली सागरे (3 हजार मालमत्ता) या भाजपच्याच आहेत.

निवडणुकीत उच्चशिक्षितांना नाकारले...!

महापालिकेचा कारभार पारदर्शी, विकासात्मक व्हावा यासाठी उच्चशिक्षित, डॉक्टर, वकील, अभियंत्यांनी निवडणुकीत उतरावे अशी जनतेची अपेक्षा असते. त्यानुसार तीनही शहरात अशा काही उच्चशिक्षित  उमेदवारांनी निवडणूकही लढविली. पण राजकीय साठमारीत दुर्दैवाने अनेक प्रभागातील नागरिकांनी त्यांना नाकारून त्यांच्यापेक्षा कमी शिकलेल्या उमेदवारांना संधी दिली. परिवर्तन आणि विकासाच्या अपेक्षा मांडणार्‍या  बुद्धिजीवी  मतदारांच्या उदासीनतेने  मतदानाची  टक्केवारीही  घसरली.  उच्चशिक्षित उमेदवारांच्या पराभवाला तेही कारण ठरल्याचे सांगितले जाते.

शिक्षण आणि गुन्हेगारीचा लेखाजोखा 

महापालिकेत जनतेने निवडून दिलेल्यांपैकी 5 पदव्युत्तर, 23 पदवीधर, 12 वी शिकलेले 12 आणि दहावी झालेले आठजण आहेत. सर्वाधिक 26 जण हे नववी शिकलेले आहेत, तर तिघेजण पाचवी झालेले आहेत. दोघांनी तर शाळेचे तोंडही पाहिलेले नाही. गुन्हे दाखल असलेले 14 जण आहेत. यामध्ये अ‍ॅड. स्वाती शिंदे, जगन्नाथ ठोकळे, दिग्विजय सूर्यवंशी, वहिदा नायकवडी, अभिजित भोसले यांच्यावर राजकीय गुन्हे दाखल आहेत. उर्वरित अनेकजणांवर मारामारीसह विविध प्रकारचे आर्थिक तसेच फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.