Wed, Apr 24, 2019 12:35होमपेज › Sangli › विटा पोलिसांकडून १४ लाखांचा मुद्देमाल जप्‍त (व्‍हिडिओ)

विटा पोलिसांकडून १४ लाखांचा मुद्देमाल जप्‍त (व्‍हिडिओ)

Published On: Feb 07 2018 8:14PM | Last Updated: Feb 07 2018 8:14PMविटा : विजय लाळे

विटा पोलिसांना घरफोडी गुन्ह्यांच्या तपासात मोठे यश मिळाले आहे.  यामध्ये विटा शहरासह जिल्ह्यातील मिरज आणि कडेगाव तालुक्यातील १५ वेगवेगळ्या घरफोडी आणि चोरी प्रकरणातील तब्बल १४ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये  येत्या २३ फेब्रुवारीला सांगलीत मोठा कार्यक्रम घेऊन किमती माल कोर्टाच्या परवानगीने संबंधितांना परत केला जाणार असल्याची माहिती सांगलीचे पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी दिली. 

याबाबत शर्मा म्हणाले , एखाद्याच्या घरातील चेन किंवा सोन्याचे दागिने जातात, त्यावेळी त्यांना फार हळहळ वाटत असते. पोलिसांनी त्यांच्या पद्धतीने तपास करून जरी ती चीज वस्तू मिळवली तरी जो पर्यंत संबंधितांना ती परत मिळत नाही तोपर्यंत त्याचा त्या तपासाचा किंवा जप्त केलेल्याचा काही फायदा नसतो म्हणून आमचा प्रयत्न आहे की, ज्याची काही चोरी झाली त्याला ती वस्तू परत लवकरात लवकर मिळाली पाहिजे. अर्थात याबाबत कोर्टाच्या सर्व प्रोसिजर्स आम्ही फॉलो करणारच आहोत. या बरोबरच ज्यांनी या तपासात चांगले काम केले त्यांचा पारितोषिक, बक्षीस वगैरे देऊन आम्ही गौरव करणार आहोत. दरम्यान या घरफोडी आणि चोरी प्रकरणी सदाशिव गुंडा पाटील .(वय ४४ रा. गळतगा , ता. चिकोडी , जि . बेळगाव, सध्या रा. दहिवडी, ता. माण , जि . सातारा) आणि त्याचा साथीदार सुनील विठ्ठल तडसरे (वय ३६, रा . बुधगाव, ता .मिरज, जि. सांगली) यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या कडून दोन चारचाकी गाड्या , सोन्याचांदीचे दागिने, रोख रक्कम, टिव्ही, फ्रिज, सोफा आणि इतर गृहोपयोगी वस्तू तसेच कृषी औषधे आणि कीटक नाशके असा एकूण तब्बल १३ लाख ९२ हजार ७९८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 

विटा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील १३,  कडेगाव हद्दीतील १ आणि मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील १ गुन्ह्याचा समावेश आहे. या तपास कामी पोलिस उपाधीक्षक अमरसिंह निंबाळकर , पोलीस निरीक्षक रवींद्र पिसाळ, सहाय्यक पोलिस निरीक्षक धनाजी पिसाळ, पोलिस उपनिरीक्षक एन. व्ही. कांबळे, हवालदार व्ही. पी. यादव आणि सायबर क्राईम विभागाचे सी. पी. गुंडेवार यांनी काम पाहिले. याबाबत शर्मा म्हणाले की सर्वसाधारणपणे लोकांना वाटते की एकदा चोरी झाली अन्‌ माल गेला की गेला परत मिळत नाही, त्यांना समजले पाहिजे की, चोरी झाली तरी सामान परत मिळते.