Thu, Jun 20, 2019 01:56होमपेज › Sangli › सांगलीत भरदिवसा दोन फ्लॅट फोडले

सांगलीत भरदिवसा दोन फ्लॅट फोडले

Published On: Dec 14 2017 1:46AM | Last Updated: Dec 14 2017 12:02AM

बुकमार्क करा

सांगली : प्रतिनिधी

शहरातील विश्रामबाग येथील सावरकर कॉलनी व पंचमुखी मारुती रस्ता परिसरातील दोन फ्लॅट चोरट्यांनी फोडले. भरदिवसा घडलेल्या या घटनेत सुमारे दोन लाखांचा ऐवज लंपास करण्यात आला.  
या प्रकरणी महेश रसिकलाल शहा (वय 45, रा. दुर्वांकूर अपार्टमेंट, पंचमुखी मारुती रस्ता, सांगली) यांनी फिर्याद दिली आहे. शहा कुटुंबासमवेत दुर्वांकूर अपार्टमेंटमध्ये राहतात. आज सकाळी अकराच्या सुमारास ते फ्लॅटला कुलूप लावून बाहेर गेले होते. दुपारी बाराच्या सुमारास ते परतल्यानंतर चोरीची घटना उघडकीस आली. चोरट्यांनी दाराचा कडी-कोयंडा तोडल्याचे दिसून आले. 

चोरट्यांनी घरात प्रवेश करून बेडरूममध्ये ठेवलेली तिजोरी फोडली होती. त्यातील साहित्य विस्कटण्यात आले होते. तिजोरीत ठेवलेल्या सोन्याच्या अंगठ्या, टॉप, पाटल्या, कर्णफुले असा ऐवज व वीस हजारांची रोकड असा एक लाखांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी शहा यांनी सांगली शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

विश्रामबाग येथील चोरीप्रकरणी सुनील चंद्रशेखर कोरे (वय 43, रा. मधुमती अपार्टमेंट, सावरकर कॉलनी) यांनी फिर्याद दिली आहे. कोरे मधुमती अपार्टमेंटमध्ये राहतात. आज सकाळी नऊच्या सुमारास मिरजेत नातेवाईकांकडे कार्यक्रम असल्याने कोरे यांची पत्नी व मुले तिकडे गेली होती. कोरे त्यांच्या कामासाठी निघून गेले होते.  त्यानंतर दुपारी पाऊणच्या सुमार त्यांच्या

शेजार्‍यांनी त्यांचा फ्लॅट फोडल्याने मोबाईलवरून सांगितले. त्यानंतर त्यांनी घराकडे धाव घेतली. फ्लॅटच्या दाराचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केल्याचे दिसून आले. आतील बेडरूममध्ये ठेवलेल्या लोखंडी तिजोरी फोडून त्यात ठेवलेले सोन्याचे दागिने व रोकड लंपास केली. यामध्ये 5 ग्रॅमची एक अंगठी, 5 व 3 ग्रॅमची कर्णफुलांचे दोन जोड, 5, अडीच, 2 ग्रॅमच्या पिळ्याच्या अंगठ्या, चांदीचा छल्ला व एक हजार रूपये रोकडचा समावेश आहे. याप्रकरणी त्यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दोन्ही ठिकाणी तज्ज्ञांनी हातांचे ठसे घेतले आहेत. तसेच श्‍वान पथकही नेण्यात आले होते. मात्र दोन्ही ठिकाणी काही अंतरावर जाऊन श्‍वान घुटमळले.