Sat, Apr 20, 2019 08:38होमपेज › Sangli › सांगलीत दोन बंगले, फ्लॅट फोडला

सांगलीत दोन बंगले, फ्लॅट फोडला

Published On: Jun 19 2018 1:24AM | Last Updated: Jun 18 2018 11:21PMसांगली : प्रतिनिधी

शहरातील विश्रामबागमधील एक फ्लॅट, एक बंगला तसेच भारत सूतगिरणीजवळील एक बंगला फोडून चोरट्यांनी सोन्या, चांदीचे दागिने, रोकड, लॅपटॉप, घड्याळ असा सुमारे साडेसहा लाखांचा ऐवज लंपास केला. शनिवारी तसेच रविवारी रात्री या तीनही घटना घडल्या. याबाबत विश्रामबाग तसेच संजयनगर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. 
भारत सूतगिरणीच्या पश्‍चिमेस साहेबलाल महमद नदाफ (वय 49) एका बंगल्यात कुटुंबासमवेत रहातात. ते व त्यांची पत्नी जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून काम करतात. दि. 15 रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास ते मल्लेवाडी (ता. मिरज) येथे शाळेत गेले होते. तेथून रमजानसाठी दोघेही जत या मूळ गावी गेले होते. 

शनिवारी दुपारी एकच्या सुमारास त्यांची दोन्ही मुले सांगलीतील बंगला बंद करून जतला गेली होती. रविवारी रात्री साडेअकराच्या सुमारास ते सांगलीत परतल्यानंतर चोरीची घटना उघडकीस आली. 

चोरट्यांनी दरवाजाचा कडी-कोयंडा उचकटून आत प्रवेश करून बेडरूममधील कपाट तोडले. त्यात ठेवलेले दागिने तसेच किचनमधील डब्यात ठेवलेले दागिने लंपास केल्याचे निदर्शनास आले. चोरट्यांनी तेथून 24 ग्रॅमची सोन्याची गोफ, 10 ग्रॅमचा नेकलेस, 15 ग्रॅमचे सोन्याचे पेंडंट, 70 ग्रॅमचे सोन्याचे वेढण, 15 ग्रॅमचे कानातील टॉप्सचे तीन जोड, पाच ग्रॅमची कानातील वेल, 30 ग्रॅमचे चांदीचे दोन करदोटे, 5 ग्रॅमचे सोन्याचे तीन बदाम, एक घड्याळ असा साडेचार लाखांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी नदाफ यांनी संजयनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

विश्रामबाग येथील सिव्हील हॉस्पीटलच्या पिछाडीस असलेल्या धनंजय हौसिंग सोसायटीतील अरिहंत बंगल्यात आप्पासाहेब बाळगोंडा पाटील पत्नीसमवेत राहतात. ते निवृत्त शिक्षक आहेत. शनिवारी दुपारी दोघेही कामानिमित्त पुण्याला गेले होते. सोमवारी दुपारी ते परतल्यानंतर चोरीची घटना उघडकीस आली. चोरट्यांनी दरवाजाचा कडी-कोयंडा उचकटून आत प्रवेश करून आतील कपाटात ठेवलेली 40 हजारांची रोकड, दोन तोळ्यांची सोन्याची चेन, एक तोळ्याची अंगठी, एक तोळ्याची कर्णफुले, चांदीची भांडी, एलईडी टीव्ही असा पावणेदोन लाखांचा ऐवज लंपास केला. विश्रामबाग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. तज्ज्ञांनी ठसे घेतले आहेत. घटनास्थळी श्‍वानपथकालाही पाचारण करण्यात आले होते. बंगल्यापासून काही अंतरावर जाऊन श्‍वान तेथेच घुटमळले. याबाबत विश्रामबाग पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. 

विश्रामबागमधील दत्तनगर येथील चिंतामणी सहनिवास या अपार्टमेंटममधील फ्लॅटमध्ये अमृता अभय वाडकर (वय 32) राहतात. शनिवारी दुपारी त्या कामानिमित्त परगावी गेल्या होत्या. चोरट्यांनी फ्लॅटचा दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून आतील कपाटात ठेवलेल्या दोन पर्स, दहा हजारांची रोकड, सोन्या, चांदीचे दागिने, आधारकार्ड, पॅनकार्ड असा 25 हजारांचा ऐवज लंपास केला. याबाबत विश्रामबाग पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.