Thu, Apr 25, 2019 15:33होमपेज › Sangli › डोंगरवाडी, बेळंकीमध्ये दरोडा; चौघांना लुटले

डोंगरवाडी, बेळंकीमध्ये दरोडा; चौघांना लुटले

Published On: May 04 2018 1:50AM | Last Updated: May 03 2018 11:37PMमिरज : शहर प्रतिनिधी 

तालुक्यातील डोंगरवाडी व बेळंकी येथे बुधवारी रात्री  चोरट्यांच्या  दोन टोळ्यांनी चाकू व काठ्यांनी मारहाण करून धुमाकूळ घातला. चौघांवर हल्ला करून त्यांना जखमी करून त्यांच्याकडील मोबाईल व रोकड लंपास केली. याबाबत मिरज ग्रामीण पोलिसांनी अज्ञात चौदा जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

बुधवारी रात्री सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास पहिली घटना डोंगरवाडी येथे घडली. याबाबत बाळासाहेब हरिबा कदम (वय 48, रा. डोंगरवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. बाळासाहेब व त्यांचा मित्र हिंमत कांबळे हे दोघेजण दुचाकीवरून डोंगरवाडी येथे घरी निघाले होते. कदमवाडी ते डोंगरवाडी या रस्त्यावर असणार्‍या पोटकालव्याजवळ त्यांना दगड मारून त्यांची दुचाकी थांबवण्यात आली.  त्या चोरट्यांनी त्या दोघांनाही खाली पाडून त्यांच्यावर चाकू व काठीने हल्ला चढवला. त्यांनी बाळासाहेबांच्या डोके व उजवा हातावर वार केले. हिंमत यांच्या उजव्या हाताचा चावा घेतला. त्यानंतर त्यांच्या खिशातील  एकवीसशे  रुपये  व दोन मोबाईल काढून तेथून पोबारा केला.

दुसरी घटना बुधवारी रात्री पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास बेळंकी रस्त्यावरील गंगा टेक येथे घडली. याबाबत विक्रम वसंत निकम (वय 30, रा. व्यंकोचीवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. विक्रम व त्यांचा भाऊ दत्तात्रय निकम हे दोघेजण दुचाकीवरून पेट्रोल भरून घरी जात होते. गंगाटेक येथे ते आले असता त्यांच्या दुचाकीसमोर काठी टाकून त्यांना खाली पाडण्यात आले. त्या दोघांनाही सहा चोरट्यांनी काठीने मारहाण करून जखमी केले. त्यांच्याजवळील दोन मोबाईल व  एकतीसशे रुपयांची रोकड असा सुमारे आठ हजार शंभर रुपयांचा माल चोरट्यांनी लंपास करून तेथून पोबारा केला. या दोन्ही प्रकारामुळे डोंगरवाडी व बेळंकी परिसरामध्ये भीतीचे वातावरण  आहे. पोलिसांनी अज्ञातावर गुन्हा दाखल केला आहे. या चोरट्यांच्या तपासासाठी ग्रामीण पोलिसांनी पथके रवाना केली आहेत.
बुधवारी रात्री डोंगरवाडी व बेळंकी येथे दरोड्याचा प्रकार घडला. डोंगरवाडी येथे आठ जणांची टोळी होती तर बेळंकी येथे सहा जणांची टोळी होती. या दोन्ही घटनांमधील कृत्य हे सारखेच असल्याने या दोन टोळ्या आहेत की एकाच टोळीने ही केलेली कृत्ये आहेत, याचा तपास  पोलिस करीत आहेत.