सांगली : प्रतिनिधी
हरिपूर (ता. मिरज) येथील बागेतील गणपती मंदिरातील तिजोरी फोडून चोरट्यांनी दोन लाख रुपये किमतीचा साडेचार किलो चांदीचा ऐवज लंपास केला. शुक्रवारी रात्री साडेनऊनंतर ही घटना घडली. याबाबत सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणी मयुरेश विनायक ताम्हणकर (वय 28, रा. हरिपूर) यांनी फिर्याद दिली आहे.
शुक्रवारी रात्री साडेनऊच्या सुमारास पुजारी मंदिर बंद करून घरी गेेले होते. शनिवारी पहाटे पाचच्या सुमारास ते पूजेसाठी आल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला. चोरट्याने गाभार्याच्या दरवाजाचा कडी कोयंडी तोडून आत प्रवेश केला आहे. गाभार्यातील एका कोपर्यात ठेवलेली तिजोरी उघडून आतील कप्प्याला असणारे लॉकही तोडले.
तिजोरीतील पाचशे ग्रॅमचा चांदीचा किरीट, बाराशे पन्नास ग्रॅमची घंटा, तीनशे ग्रॅमची चांदीची दोन ताम्हणे, अडीचशे ग्रॅमचा एक तांब्या, दीडशे ग्रॅमची पळी व भांडे, साडेसातशे ग्रॅमचा चांदीचा उंदीर, साडेचारशे ग्रॅमचे चांदीचे छत्र, अडीचशे ग्रॅमचे अभिषेक पात्र, आठशे ग्रॅमची चांदीची पंचारती असा चार हजार सातशे ग्रॅम चांदीचा ऐवज लंपास केल्याचे लक्षात आले.
त्यानंतर ताम्हणकर यांनी तातडीने सांगली ग्रामीण पोलिसांशी संपर्क साधला. पोलिस निरीक्षक रविंद्र डोंगरे यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेतली. श्वानपथकालाही पाचारण करण्यात आले होते. मंदिराच्या पाठीमागून हरिपूूर रस्त्यावर असलेल्या रामकृष्ण वाटिकेपर्यंत श्वानाने माग काढला मात्र तेथेच ते घुटमळले. घटनास्थळी तज्ज्ञांनी ठसेही घेतले आहेत. याप्रकरणी अज्ञाताविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या मंदिर परिसरात जवळपासही कोणीही रहायला नाही. त्यामुळे तोडफोडीचा आवाज कोणालाच ऐकू आला नसल्याचे सांगण्यात आले. शिवाय गाभार्यात ठेवलेल्या तिजोरीला कुलूपही लावण्यात आलेले नव्हते असेही पोलिसांनी सांगितले.