Fri, Apr 26, 2019 17:36होमपेज › Sangli › सांगलीत भरदिवसा बंगला फोडला

सांगलीत भरदिवसा बंगला फोडला

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सांगली : प्रतिनिधी

शहरातील वानलेसवाडीतील शिवशंकर कॉलनीतील बंद बंगला भर दिवसा फोडून चोरट्याने 19 तोळ्यांचे सोन्याचे दागिने लंपास केले. बुधवारी (दि. 21) दुपारी ही घटना घडली. याबाबत विश्रामबाग पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. भरदिवसा लाखो रुपयांचे दागिने लंपास झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. 

याप्रकरणी मीनाक्षी तुकाराम खांडेकर यांनी फिर्याद दिली आहे. खांडेकर पती, मुलासमवेत शिवशंकर कॉलनीत मिटु बंगल्यात राहतात. त्यांचे पती मुंबईत पोस्टमन म्हणून काम करतात. आठ दिवसांपूर्वी त्यांच्या पतीची तब्येत बरी नसल्याने ते सांगलीत आले होते. ते खणभागातील मेहुणीकडे राहिले होते. 

दि. 21 रोजी सकाळी मीनाक्षी जेवण करण्यासाठी बंगला बंद करून खणभागात बहिणीकडे गेल्या होत्या. त्यांचा मुलगा माधवनगर येथे कामावर गेला होता. तेथून त्या दुपारी अडीचच्या सुमारास घरी परतल्या. त्यावेळी चोरीची घटना उघडकीस आली. 

घराला लावलेले कुलूप त्यांना दिसले नाही. तसेच दरवाजाही अर्धवट उघडा होता. त्यांनी आत प्रवेश करून बेडरूममध्ये पाहिले असता तेथील लोखंडी कपाट उघडे असल्याचे दिसून आले. कपाटातील ड्रॉव्हर उघडून चोरट्यांनी साडेतीन तोळ्यांचे तोडे, चार तोळ्यांचे बिल्वर, साडेतीन तोळ्यांचे गंठण, पाच ग्रॅमचे झुबे, 5 ग्रॅमचे वेल, एक तोळ्याचा नेकलेस, 5 ग्रॅमच्या रिंगा, 3 ग्रॅमच्या रिंगा, दोन ग्रॅमच्या रिंगा, तीन ग्रॅम, चार ग्रॅम, एक तोळे वजनाच्या दोन अशा चार अंगठ्या, 5 ग्रॅमची रिंग, दोन ग्रॅमची नथ, दीड तोळ्यांची चेन, 5 ग्रॅमचे टॉप्स, दोन ग्रॅमचे डूल असा सुमारे 19 तोळ्यांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याचे दिसून आले. 

याबाबत त्यांनी विश्रामबाग पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. श्‍वानपथकालीही पाचारण करण्यात आले होते. मात्र काही अंतरावर जाऊन श्‍वान घुटमळले. तज्ज्ञांनी ठसेही घेतले आहेत. 


  •