Sat, Aug 24, 2019 21:31होमपेज › Sangli › शिक्षक बदलीचा सिलसिला पुन्हा सुरू

शिक्षक बदलीचा सिलसिला पुन्हा सुरू

Published On: Jan 10 2018 1:59AM | Last Updated: Jan 09 2018 11:34PM

बुकमार्क करा
सांगली : प्रतिनिधी

जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांचा सिलसिला पुन्हा सुरू होत आहे. सन 2017-18 च्या बदलीसाठी दि. 16 जानेवारीपासूनच बदली प्रक्रिया सुरू होणार आहे. त्याबाबत शासन परिपत्रक जारी झाले आहे. 

शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांबाबत दि. 27 फेब्रुवारी 2017 रोजी शासन निर्णयान्वये सुधारित धोरण निश्‍चित झालेले आहे. या धोरणानुसार संगणकीय पद्धतीने या वर्षीची बदली प्रक्रिया करण्यात येणार आहे. यासाठी सर्व शिक्षकांचे शाळानिहाय मॅपिंग होणे आवश्यक आहे. 

सध्या जिल्हा परिषद शाळांची संच मान्यता अंतिम करण्याची कार्यवाही चालु आहे. शालेय शिक्षण विभागाने सर्व शाळांना सरल प्रणालीद्वारे ऑनलाईन पद्धतीने संच मान्यता पूर्ण करण्यासाठी शाळेची व विद्यार्थ्यांची माहिती शाळा व केंद्रप्रमुख लॉगीनमधून फॉरवर्ड करण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. 

दि. 16 जानेवारीपासून लगेचच जिल्हांतर्गत बदलीची  प्रक्रिया सुरू होणार आहे. जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया ही मुदतीत व नियोजनबद्ध होणे गरजेचे आहे. यासंबंधिच्या प्रक्रियेत जाणीवपूर्वक हलगर्जीपणा करणार्‍या कर्मचार्‍यावर कडक कार्यवाही करण्यात यावी. तसेच समायोजनाची प्रक्रिया कोणत्याही परिस्थितीत दि. 15 जानेवारी 2018 पूर्वी करण्याची दक्षता घ्यावी, असे शासनाचे पत्र जिल्हा परिषदेला आलेले आहे.  बदलीसाठी संवर्गनिहाय फॉर्म पुन्हा भरून घेतले जाणार आहेत. जिल्हांगर्तत बदली प्रक्रियेत गेल्यावेळी झालेल्या चुका लक्षात घेऊन शासनाने यावेळी जानेवारी महिन्यापासूनच प्रक्रिया सुरू केली आहे. मे महिन्यात बदलीची प्रक्रिया पूर्ण होईल, असे संकेत मिळत आहेत. 

‘27/2’ च्या बदली धोरणातील दुरुस्तीकडे लक्ष
प्राथमिक शिक्षक समितीचे त्रैवार्षिक अधिवेशन नुकतेच ओरोस येथे झाले. शिक्षकांच्या ‘27/2’च्या बदली धोरणातील त्रुटी दुरुस्त केल्या जातील, असे आश्‍वासन ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी दिलेले आहे. तालुकाबाह्य बदल्या होणार नसल्याचे मुंडे यांनी आश्‍वासन दिल्याचे समितीच्या पदाधिकार्‍यांनी सांगितले आहे. दरम्यान बदली धोरणातील नेमक्या कोणत्या त्रुटींची दुरुस्ती होणार, त्याचा दिलासा मिळणार का, याकडे अनेक शिक्षकांचे लक्ष लागले आहे.