Sun, May 26, 2019 18:40होमपेज › Sangli › ‘रिकॉल’मुळे शिक्षक बदल्यांचा पुन्हा ‘खो-खो’

‘रिकॉल’मुळे शिक्षक बदल्यांचा पुन्हा ‘खो-खो’

Published On: May 31 2018 1:46AM | Last Updated: May 30 2018 11:38PMसांगली : प्रतिनिधी

समानीकरणाच्या पदावर बदली झालेल्या शिक्षकांना ‘रिकॉल’ करून त्यांना नव्याने शाळा देण्यासाठी प्रशासनाच्या हालचाली सुरू आहेत. त्यामुळे सुमारे शंभर ते दीडशे शिक्षकांना ‘खो’ बसून ते विस्थापित होणार आहेत. सध्याच्या 126 विस्थापितांनाही बदलीसाठी वीस पसंतीक्रम भरता येणार आहेत. त्यामुळेही काही शिक्षक विस्थापित होणार आहेत. आणखी किमान तीनशे बदल्या होतील, असे संकेत मिळत आहे. बदलीचा ‘खो’ लांबत गेल्यास अधिक बदल्या होतील, अशी चर्चा आहे. 

जिल्हा परिषद प्राथमिक शाळांकडील 2166 शिक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. विस्थापित झालेले व पसंतीची शाळा न मिळालेल्या 126 शिक्षकांना पुन्हा पसंतीची शाळा नोंदवण्याची संधी देण्यात आली आहे. दि. 31 मे रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत विस्थापित शिक्षकांना ऑनलाईन पसंतीक्रम भरता येणार आहेत. समानीकरणासाठी रिक्त ठेवलेल्या जागा बदलीप्रक्रियेत ‘कंपलसरी व्हॅकंट’ ठेवायच्या होत्या. मात्र बदली प्रक्रियेत त्रुटी राहिल्याने या जागा व्हॅकंट न ठेवता त्या जागांवर शिक्षकांची बदली केलेली आहे. अशा सुमारे 100 ते 150 शिक्षकांना आता ‘रिकॉल’ करून पुन्हा पसंतीक्रमानुसार बदलीचे ठिकाण दिले जाणार आहे. त्यामुळे शिक्षक बदल्यांचा ‘खो’ पुन्हा सुरू होणार आहे. 

विस्थापितांना  समानिकरणच्या शाळा द्या:  शिक्षक समिती

विस्थापित शिक्षकांना समानिकरणासाठी रिक्त असणार्‍या व बदलीने रिक्त झालेल्या सर्व जागा फॉर्म भरताना उपलब्ध करून द्याव्यात,अशी मागणी शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब लाड यांनी केली आहे.  बदलीप्रक्रियेमध्ये ज्या शिक्षकांच्यावर अन्याय झालेला आहे अशा शिक्षकांनी गटशिक्षणाधिकारी यांचेकडे त्रुटींचे अर्ज सादर केलेले आहेत अशा सर्व अर्जाचा आढावा शासनास कळवावा. अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन याच बदलीप्रक्रियेत करावे, अशी मागणी केली आहे. किरणराव गायकवाड, किसनराव पाटील, शिक्षक बँकेचे अध्यक्ष महादेव माळी, सुनिल गुरव, सदाशिव पाटील, शशिकांत बजबळे, यु.टी.जाधव, शिवाजी पवार,श्रेणिक चौगुले, हरिभाऊ गावडे, रमेश पाटील, शिवाजी धडस उपस्थित होते.

बदल्यात अनेक त्रुटी, बदली प्रक्रिया थांबवा : शिक्षक संघ

जिल्हांतर्गत बदलीप्रक्रियेतील त्रुटींमुळे तक्रारींचा ओघ सुरू आहे. त्यामुळे बदली प्रक्रिया थांबवावी, अशी मागणी शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष विनायक शिंदे, अविनाश गुरव व शिष्टमंडळाने मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे. सेवाजेष्ठता डावलून ज्युनियर शिक्षकांची नेमणूक, एकाच पदावर दोन शिक्षकांची नेमणूक, पती-पत्नी यांना 30 कि.मी पेक्षा जास्त अंतराने  विस्थापित होणे, सिनिअर शिक्षकांना ज्युनिअर शिक्षकांची जागा न मिळणे,अ से प्रकार घडले असल्याकडे लक्ष वेधले. रिक्त जागांवर विस्थापित शिक्षकांची नेमणूक करावी, अशी मागणी केली. दरम्यान त्रुटी, आक्षेप, तक्रारींचा अहवाल शासनाला पाठविला जाईल मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सांगितले. शशिकांत माणगावे, महादेव हेगडे, शशिकांत कांबळे, शब्बीर तांबोळी, अजित पाटील, प्रभाकर व्हनकडे व शिक्षक उपस्थित होते. 

वैद्यकीय दाखले तपासा, पात्र नसतानाही बदली?

बदली अधिकारपात्रसाठी काही शिक्षकांनी सादर केलेले वैद्यकीय दाखले तपासावेत. गैरप्रकार समोर येतील, असे काही शिक्षकांनी सांगितले. दरम्यान, बदलीसाठी सेवाज्येष्ठता यादी तयार करताना जिल्हा परिषदेतील सेवा विचारात घेऊन सेवाज्येष्ठता यादी तयार करावी असा नियम आहे. पण काहींनी महापालिकेतील सेवाज्येष्ठताही धरून सोयीची शाळा बळकावली आहे, अशी तक्रार काही शिक्षकांनी केली आहे. आंतरजिल्हा बदलीने आलेले काही शिक्षक बदलीपात्र नसतानाही बदली प्रक्रियेत घुसल्याचेही काही शिक्षकांनी सांगितले. या प्रकारांच्या चौकशीचेही संकेत मिळत आहेत.