Tue, Sep 25, 2018 02:59



होमपेज › Sangli › महाविद्यालयीन तरुणीची आत्महत्या

महाविद्यालयीन तरुणीची आत्महत्या

Published On: Jan 22 2018 1:23AM | Last Updated: Jan 22 2018 1:23AM



तासगाव : शहर प्रतिनिधी

येथील शासकीय महिला तंत्रनिकेतन महाविद्यालयातील  विद्यार्थिनी प्रणाली प्रकाश पाटील (वय 17, रा. साखराळे, ता. वाळवा) हिने ओढणीने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी  घडली. ती ड्रेस डिझायनर शाखेला द्वितीय वर्षात शिकत होती. याबाबत महाविद्यालयाच्या अधिव्याख्याता सुप्रिया माळी यांनी फिर्याद दिली.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, की प्रणाली ही गेल्या दोन वर्षांपासून महिला तंत्रनिकेतन येथे शिक्षण घेत होती. ती येथील शासकीय वसतिगृहामध्ये अन्य तीन मुलींसोबत राहत होती. तिच्यासोबतच्या मुली शनिवारी गावी गेल्या होत्या. प्रणालीदेखील गावाला जाणार होती. तसा अर्जही तिने लिहिला होता; मात्र तिचे जाणे अचानक रद्द झाले. शनिवारी सायंकाळी तिचे फोनवरून    
 आई वडिलांशी बोलणेही झाले होते. तेव्हा ती व्यवस्थित बोलली होती. 

रविवारी सकाळी 10 वाजले तरी प्रणालीने दरवाजा उघडला नाही म्हणून शेजारी राहणार्‍या मुलींनी तेथील महिला शिक्षकांना माहिती दिली. त्यांनी प्रणालीच्या खोलीत खिडकीमधून डोकावून पाहिले असता तिने गळफास घेतला असल्याचे उघड झाले. 

तासगाव पोलिसांशी संपर्क साधून माहिती दिली. पोलिस उपनिरीक्षक प्रियांका सराटे यांनी प्राथमिक तपास केला. तिने सकाळी नऊच्या सुमारास आत्महत्या केली असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. 
सराटे म्हणाल्या की, प्राणलीजवळ सापडलेल्या चिट्ठीत तिने, ‘माझ्या आत्महत्येला कोणालाही जबाबदार धरू नये’, असे म्हटले आहे.