Wed, May 22, 2019 21:19होमपेज › Sangli › टार्गेट किमान 90 टक्के मतदानाचे

टार्गेट किमान 90 टक्के मतदानाचे

Published On: Jul 18 2018 1:54AM | Last Updated: Jul 17 2018 8:31PMसांगली : प्रतिनिधी

राज्य निवडणूक  आयोगाच्या आदेशानुसार महापालिका निवडणुकीत मतदानाची टक्केवारी किमान 90 टक्केपर्यंत वाढविण्याचे टार्गेट आम्ही ठेवले आहे. त्याअंतर्गत महिनाभरापासून जागृतीमोहीम सुरू असल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा आयुक्‍त रविंद्र खेबुडकर यांनी ‘पुढारी’शी बोलताना सांगितले. 

ते म्हणाले, मतदानप्रक्रिया आणि त्यातून योग्य लोकप्रतिनिधी निवडणे हा घटनेने दिलेला अधिकार आहे. त्यासाठी 1 ऑगस्टरोजी होणार्‍या महापालिका निवडणुकीसाठी मतदान केलेच पाहिजे. परंतु आजपर्यंतची मतदानाची टक्केवारी पाहिली असता केवळ 59 ते 63 टक्केपर्यंतच मतदान होत आले आहे. पाच वर्षे जे लोकप्रतिनिधी शहराच्या विकासाची जबाबदारी पेलू शकतात. असे सक्षम उमेदवार निवडून देणे आवश्यक असते. परंतु मतदानासाठी सुटी घेऊन परगावी जाणार्‍यांमुळे टक्केवारी घसरते. पुन्हा लोकप्रतिनिधी योग्य नाहीत, कामे होत नाहीत, अशी ओरड सुरू असते. याला आपणच जबाबदार आहोत, हे लक्षात घेतले पाहिजे.

ते म्हणाले, याअंतर्गत अधिकाधिक मतदारांना आपला हक्क बजाविण्यासाठी मतदार नोंदणीतही वाढ व्हावी यासाठी खबरदारी घेतली आहे. यातून तीनही शहरात 54 हजारांहून अधिक मतदार वाढले आहेत. पहिल्यांदाच सीमेवर असलेल्या महापालिका क्षेत्रातील 147 सैनिक मतदारांना मतदानाचा हक्क दिला आहे. त्यांचे पोस्टल मतदानही घेण्यात येणार आहे.  खेबुडकर म्हणाले, आता मतदानाची मागची 63 टक्केची आकडेवारी यावेळी 90 टक्केपर्यंत पोहोचण्याचे ध्येय घेऊन आम्ही काम करीत आहोत.

याअंतर्गत सर्व महाविद्यालये, शासकीय, खासगी संस्थांमध्ये जाऊन जागृती केली आहे. विविध ऑनलाईन संदेश, फेसबुक, ट्विटर, व्हॉटस्अ‍ॅपच्या माध्यमातूनही मतदान जागृतीची मोहीम चालविली आहे. या अभियानाचा भाग म्हणूनच भव्य मतदार जागृती रॅली काढली. यामध्ये   चित्ररथ, पथनाट्य, ढोलवादक, कर्नाटकातील गारुडी झुंबे, मुखवटे आकर्षण होते. यातून मतदारांना ‘1 ऑगस्ट, मतदान फर्स्ट’ संदेश देणारी पत्रके वाटण्यात आली. ते म्हणाले, मतदारांना सोयीस्कर अशी 544 सुसज्ज आदर्श मतदान केंद्रे  तयार केली आहेत. त्याचेही शिवाजी विद्यापीठाच्या टीमकडून थर्डपार्टी ऑडिट करून घेतले आहे. जी संवेदनशील मतदान केंद्रे आहेत तेथे पोलिस बंदोबस्तही ठेवला आहे. मतदानात अडथळ आणणार्‍यांचीही यादी तयार केली आहे. त्यांच्यावरही कडक कारवाई केली जाईल. 

प्रलोभनाला बळी पडू नका : निवडणूक आयुक्‍त

राज्य निवडणुक आयुक्‍त जे. एस. सहारिया म्हणाले,  आपले मतदान आपले गाव, शहर आणि पर्यायाने देशाचे भवितव्य ठरवते. त्यामुळे मतदानाचा हक्क सांगली, मिरज आणि कुपवाड शहर नागरिकांनी बजावलाच पाहिजे. प्रलोभनाला बळी न पडता सद्सद्विवेक बुद्धी ठेवून मतदान करा.

मतदान शहर विकासाची जबाबदारीच : प्रतीक्षा लोणकर

अभिनेत्री प्रतीक्षा लोणकर म्हणाल्या, महापालिका निवडणुकीसाठी मतदान 100 टक्के व्हावे यासाठी  आयुक्‍त रवींद्र खेबुडकर प्रयत्नशील आहेत. मतदान हा शहर विकासाचा भाग  असून, पाच वर्षे भागातील समस्या सोडविणारा, शहर विकासासाठी योग्य प्रतिनिधी निवडण्याची ही प्रक्रिया आहे. मतदानाचा हक्क सवार्र्ंनी बजावलाच पाहिजे.