Wed, Jan 22, 2020 23:45होमपेज › Sangli › ताकारी पाणी योजना २९ पासून सुरू होणार

ताकारी पाणी योजना २९ पासून सुरू होणार

Published On: Dec 25 2017 1:18AM | Last Updated: Dec 24 2017 11:47PM

बुकमार्क करा

कडेगाव : शहर प्रतिनिधी 

ताकारी योजनेची वीज बिल थकबाकी भरण्यासाठी सोनहिरा, उदगिरी, केन अ‍ॅग्रो, क्रांती आणि ग्रीन पॉवर शुगर हे साखर कारखाने प्रत्येकी एक कोटी रुपये अ‍ॅडव्हान्स देणार आहेत. योजनेची साडेदहा कोटी वीज बिल थकबाकी आहे. त्यापैकी 5 कोटी 18 लाख रुपये महावितरणकडे भरून योजना शुक्रवार, दि. 29 रोजी सुरू केली जाणार आहे.

हा निर्णय येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. तसेच टेंभू योजनेचीही वीज बिल थकबाकी भरून आवर्तन सुरू करण्याबाबत लवकरच मार्ग काढला जाईल, असेही यावेळी ठरले. पत्रकार संघाच्या पुढाकाराने ही बैठक झाली.

सोनहिरा साखर कारखान्याचे अध्यक्ष आमदार मोहनराव कदम , क्रांती कारखान्याचे अध्यक्ष अरुणअण्णा लाड, केन अ‍ॅग्रो कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, आमदार अनिल बाबर, श्रमिक मुक्‍ती दलाचे नेते मोहनराव यादव, तसेच ताकारी योजनेचे कार्यकारी अभियंता प्रकाश पाटील यावेळी उपस्थित होते.

वीज बिल थकबाकीमुळे ताकारी योजनेचा वीजपुरवठा महावितरणने खंडित केला आहे. सध्या योजनेकडे पाणीपट्टीचे कारखान्यांकडून जमा झालेले 1 कोटी 23 लाख रुपये  आहेत. आता पाच कारखान्यांकडून  प्रत्येकी एक कोटी असे  5 कोटी रुपये जमा होतील. ही रक्‍कम दोन दिवसांत महावितरणला दिली जाईल, असे आमदार  कदम, अरुणअण्णा लाड व पृथ्वीराज देशमुख यांनी सांगितले. त्यानंतर वीजपुरवठा पूर्ववत होईल व ताकारी योजना शुक्रवारी सुरू होईल.

ताकारी आणि टेंभू योजनांच्या लाभक्षेत्राबाहेरील काही कारखाने योजनांची पाणीपट्टी वसूल करतात, भरत मात्र नाहीत. परंतु, ऊस मात्र नेतात अशी चर्चा झाली. या  कारखान्यांना जिल्हाधिकारी यांनी नोटिसा देऊन त्यांच्याकडून पाणीपट्टी वसूल करावी. शेतकर्‍यांनीही अशा कारखान्यांना ऊस देऊ नये. त्यांच्या ऊसतोडीस   एकसंधपणे विरोध करावा, अशीही या बैठकीत चर्चा झाली.

आमदार बाबर म्हणाले, कडेगाव आणि पलूस तालुक्यातील नेते  राजकारण बाजूला ठेवून एकत्र आले आहेत. तसेच टेंभू योजनेच्या लाभक्षेत्रातील अन्य नेते व   कारखानदार एकत्र आल्यास आवर्तनाचा मार्ग मोकळा होईल .शासनाकडून येणारी टंचाई  निधीची रक्कम, पाणीपट्टी वसुली आणि गरज पडल्यास अ‍ॅडव्हान्स घेऊन टेंभू योजनेचे आवर्तनही तातडीने सुरू करता येईल. भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजाराम  गरुड ,शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष  संजय विभुते ,शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष युनुस पटेल ,शिवसेनेचे तालुकाध्यक्ष  सुभाष मोहिते  उपस्थित होते .