Wed, Aug 21, 2019 15:41होमपेज › Sangli › ताकारीच्या वाढीव पाणीपट्टीस विरोध 

ताकारीच्या वाढीव पाणीपट्टीस विरोध 

Published On: Dec 01 2017 9:10AM | Last Updated: Nov 30 2017 8:35PM

बुकमार्क करा

देवराष्ट्रे : वार्ताहर

ताकारी उपसा सिंचन योजनेच्या पाणीपट्टीत हेक्टरी तब्बल 4 हजार रुपयांची वाढ झाली आहे. महावितरणकडून  वीज बिलामध्ये कोणतीही सवलत दिली जात नसल्याने पाणीपट्टीचे दर वाढल्याचे कारण पाटबंधारे विभागाकडून दिले जात आहे. मात्र यामुळे लाभ क्षेत्रातील शेतकर्‍यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे.  नेत्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने पाणीपट्टी पूर्ववत करण्यासाठी शेतकरी आक्रमक झाला आहे. तो आंदोलनाच्या पवित्र्यात आहे.

मागील वर्षी बारमाही पिकांसाठी प्रति हेक्टरी 18715 (7486 प्रति एकर) रुपयांची पाणीपट्टी आकारली जात होती. मात्र यामध्ये प्रति हेक्टरी तब्बल 4 हजार रुपयांची  वाढ करण्यात आली आहे. शेतकर्‍यांना 22555 रुपये प्रति हेक्टर (9022-प्रति एकर) एवढी पाणीपट्टी भरावी लागणार आहे. तर द्राक्षबागेसाठी प्रति हेक्टर 14160 (5664-प्रति एकर)एवढी  पाणीपट्टी भरावी लागणार आहे.

वेळेत पाणीपट्टी भरूनही योजनेच्या  प्रशासनाकडून  योग्य वेळी पाणी उपलब्ध होत नसल्यानेही  शेतकर्‍यांचे  मोठे नुकसान होत आहे. चालू व  मागील वर्षीही    ताकारी  योजनेचे रब्बी हंगामातील पहिले आवर्तन  सुरू   करण्यासाठी शेतकर्‍यांना रस्त्यावर उतरावे लागले होते. शिवाय  योजनेची अपूर्ण असलेली कामे यामुळेही शेतकर्‍यांना थेट शेतात पाणी उपलब्ध होत नाही. तरीही शेतकरी पाणीपट्टीची रक्कम भरण्यास तयार आहे. 

मात्र योजनेच्या प्रशासनाने महावितरण कंपनीकडून वीज बिलात सवलत मिळत नसल्याचे कारण सांगून हेक्टरी तब्बल 4 हजार रुपयांची पाणीपट्टी वाढविली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांतून असमाधान व्यक्त केले जात आहे. आम्हाला योग्यवेळी थेट शेतात पाणी द्या आणि मग हवी तेवढी पाणीपट्टी आकारणी करा, असे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे.

ताकारीच्या प्रशासनाने वाढीव पाणीपट्टी रद्द करून पूर्वीच्याच दराने पाणीपट्टीची रक्कम शेतकर्‍यांकडून वसूल करावी. योजनेचे रब्बी हंगामातील लांबलेले आवर्तन सुरू करावे, अन्यथा आंदोलन करण्याचा निर्धार शेतकरी बोलून दाखवित आहेत.