होमपेज › Sangli › सांगलीत युवकावर गुप्तीने हल्ला

सांगलीत युवकावर गुप्तीने हल्ला

Published On: Dec 17 2017 12:21AM | Last Updated: Dec 17 2017 12:21AM

बुकमार्क करा

सांगली : प्रतिनिधी

शहरातील कॉलेज कॉर्नर परिसरात  ‘रागाने का पाहिलेस’ असे म्हणत एका युवकावर गुप्तीने हल्ला करण्यात आला. त्याच्या डाव्या मांडीवर खोलवर तीन वार करण्यात आले आहेत. शनिवारी सायंकाळी पाचच्या सुमारास ही घटना घडली. घटनेनंतर तीन हल्लेखोर पळून गेले. याप्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. 

यामध्ये रोहित रामाप्पा कुरणे (वय 18, रा. भीमनगर, टिंबर एरिया) जखमी झाला आहे. याप्रकरणी अवधूत पाटीलसह दोन अनोळखींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सायंकाळी पाचच्या सुमारास रोहित मित्रांसमवेत बोलत राहिला होता. त्यावेळी अवधूत पाटील अन्य दोघांना घेऊन त्या ठिकाणी मोटारसायकलवरून आला. 

त्यावेळी रोहित व अवधूतने एकमेकांकडे रागाने पाहिले. अवधूतने माझ्याकडे रागाने का पाहत आहेस, असा जाब रोहितला विचारला. त्यानंतर अचानक त्याने गुप्ती काढून रोहितवर वार करण्यास सुरुवात केली. यामध्ये त्याच्या डाव्या मांडीवर खोलवर तीन वार झाले आहेत. या घटनेनंतर अवधूत साथीदारांसमवेत निघून गेला. रोहितला रक्तबंबाळ अवस्थेत सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.रात्री उशिरा विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.