Wed, Sep 18, 2019 11:07होमपेज › Sangli › गोड मिठाईतील कडवी ‘सच्चाई’!

गोड मिठाईतील कडवी ‘सच्चाई’!

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सांगली : सुनील कदम

कोणतीही मिठाई म्हटली की, लहानांपासून  थोरांपर्यंत सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटते. आज बाजारात वेगवेगळ्या नावाचे मिठाईचे  शेकडो प्रकार उपलब्ध आहेत. मात्र, भेसळीचे सर्वाधिक जीवघेणे प्रकार आणि प्रमाण मिठाईमध्येच आढळून येतात. 

प्रामुख्याने कोणत्याही प्रकारची मिठाई ही दूध, तूप, लोणी, खवा, चक्‍का, श्रीखंड, बासुंदी यासारख्या दुग्धजन्य पदार्थांपासूनच बनविली जाते. या मिठाईमध्ये प्रामुख्याने पेढे, बर्फी, गुलाबजाम, लाडू, काजूकतली, हलवा, रसगुल्ले, सोनपापडी, वेगवेगळी चॉकलेटस् असे शेकडो प्रकार येतात. याशिवाय प्रांतनिहाय मिठाईचा विचार करायचा झाल्यास मिठाईचे हजारो प्रकार समोर येतात.

आजकाल मिठाईचे हे जवळपास सगळे प्रकार मिठाईच्या दुकानांमधून सर्वत्र विक्रीसाठी उपलब्ध आहेत. मिठाईच्या दुकानांच्या आसपास त्यांचा सुगंध दरवळत असतो. त्यामुळे रंगीबेरंगी आणि आकर्षक आवरणांमध्ये पॅकिंग केलेली ही मिठाई ग्राहकांना आणि प्रामुख्याने लहान मुलांना अगदी हमखास भुरळ पाडते. मात्र, यापैकी कोणती मिठाई खरी आणि कोणती मिठाई भेसळीची आहे, याचा ग्राहकांना थांगपत्ता लागत नाही. जिल्ह्यात परंपरागतपणे मिठाईचा व्यवसाय करणारी आणि खर्‍याखुर्‍या मिठाईसाठी आपला नावलौकिक टिकवून असलेली काही दुकाने आहेत. मात्र, त्यांच्या शंभरपट भेसळीचा मिठाई बाजार मांडून बसलेली दुकाने आहेत. अशा भेसळीच्या मिठाई दुकानांमध्ये मिळणारी मिठाई म्हणजे एक जीवघेणा प्रकार आहे. अशा मिठाईमध्ये कृत्रिम रंग, खराब झालेला आणि अतिशय अस्वच्छ असा खवा, खव्याच्या जागी मैदा, दुग्धजन्य पदार्थांच्या वासासाठी अ‍ॅजिनोमोटोसह वेगवेगळी रसायने वापरली जातात. जी मानवी आरोग्याच्याद‍ृष्टीने अत्यंत घातक आहेत. 

या असल्या मिठाईमध्ये  अनेकदा दुग्धजन्य पदार्थांचा लवलेशही नसतो. दुग्धजन्य पदार्थांपासून केलेली मिठाई फार-फार तर आठ-दहा दिवस टिकते. मात्र, या प्रकारच्या बोगस मिठाईवर एक्स्पायरी डेटच नसल्यामुळे ही भेसळयुक्‍त मिठाई महिनोन्महिने दुकानांत ठाण मांडून बसलेली दिसते. या भेसळबाज मिठाईच्या किंमती खर्‍याखुर्‍या मिठाईपेक्षा खूपच कमी असल्यामुळे प्रामुख्याने गोरगरीब आणि काही प्रमाणात मध्यमवर्गीय समाज या भेसळीच्या मिठाईला बळी पडताना दिसतो. प्रामुख्याने सणासुदीच्या दिवसांत या भेसळयुक्‍त मिठाईचे मोठे थैमान बघायला मिळते.