Fri, Jul 19, 2019 16:49होमपेज › Sangli › आतेभावानेच काढला काटा

आतेभावानेच काढला काटा

Published On: Mar 01 2018 1:28AM | Last Updated: Mar 01 2018 12:39AMसांगली :प्रतिनिधी

शहरातील संजयनगर येथील  संजय जाधव याच्या खूनप्रकरणी त्याचा आतेभाऊ प्रकाश बाळासाहेब जगताप (वय 28, रा. पाटणे प्लॉट, संजयनगर) याला पोलिसांनी बुधवारी अटक केली. आपल्या मामीशी अनैतिक संबंध ठेवल्याच्या रागातूनच  संजय जाधवचा काटा काढल्याची कबुली जगताप याने दिली आहे. संशयिताला गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक रमेश भिंगारदेवे यांनी दिली.     

संशयित जगताप मृत संजय जाधवचा आतेभाऊ आहे. दहा वर्षांपूर्वीपासून संजयचे प्रकाशच्या मामीशी अनैतिक संबंध होते. यावरून त्या दोघांमध्ये यापूर्वीही वाद झाला होता. हे संबंध तोडून टाकण्याविषयी प्रकाशने संजयला वारंवार सूचना दिल्या होत्या. मात्र संजयचे संबंध सुरूच होते. मंगळवारी दुपारी संजय प्रकाशच्या मामीच्या घरी गेला होता. ते प्रकाशने पाहिले होते. त्यामुळे त्याला राग अनावर झाला होता. त्यामुळे दुपारी अडीच वाजल्यापासून संजयला संपविण्याच्या हेतूने प्रकाश त्याच्या मागावरच होता. 

सायंकाळी सहाच्या सुमारास संजयनगर येथील स्टेट बँक कॉलनीसमोर अभयनगर स्टॉपजवळ असलेल्या गुडलाईन फर्निचर इंडस्ट्रीजमध्ये संजय प्लायवूड खरेदी करण्यासाठी मोटारसायकलवरून (केए 23 इडी 9529) गेला होता. प्लायवूड खरेदी केल्यानंतर तो कारखान्यातून बाहेर आला. 
कारखान्याचा बाहेरच लावलेल्या त्याच्या मोटारसायकलजवळ आल्यानंतर तोंडाला रूमाल बांधून प्रकाश तेथे आला. संजयला काही कळायच्या आत त्याने त्याच्या तोंडावर चटणी पूड फेकली. अचानक घडलेल्या या घटनेने भांबावलेला संजय हातातील प्लायवूड गाडीजवळच टाकून फर्निचरच्या कारखान्यात घुसला. यावेळी प्रकाशने धारदार कोयता घेऊन त्याचा पाठलाग सुरू केला. 
 

संजयचा हत्यार घेऊन पाठलाग होत असल्याचे पाहून कारखान्यातील कामगार भीतीने हातातील काम टाकून बाहेर पळून गेले. यावेळी संजयने त्याला प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये प्रकाशच्या हाताला जखमही झाली; मात्र राग अनावर झाल्याने प्रकाशने कोयत्याने संजयच्या गळ्यावर, डोक्यावर सपासप वार केले. घाव वर्मी बसल्याने संजय तेथेच रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. तो ठार झाल्याची खात्री पटल्यानंतर प्रकाश शांतपणे कारखान्यातून बाहेर पडला.  त्याने रस्ता चालत ओलांडला. रस्त्याच्या कडेला लावलेली मोटारसायकल घेऊन तो निघून गेला.  

ही घटना घडताना तेथे गर्दी जमली होती. मात्र प्रकाशच्या हातात कोयता असल्याने कोणीही त्याला पकडण्याचे धाडस केले नाही. रात्री उशिरा पोलिसांनी संजयच्या  नातेवाईकांकडे कसून चौकशी केली. मात्र सुगावा लागत नव्हता.  प्रकाश मात्र दुपारपासून गायब असून रात्री उशीर झाला तरी तो सापडत नसल्याने पोलिसांना त्याचा संशय आला. त्यामुळे त्याला पकडण्यासाठी कुपवाड एमआयडीसीमध्ये सापळा लावण्यात आला. 

आज पहाटे चारच्या सुमारास त्याला पकडण्यात आले. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर त्याने खुनाची कबुली दिली. मामीशी असलेल्या अनैतिक संबंधातूनच संजय याचा खून केल्याचीही कबुली त्याने दिली असे पोलिसांनी सांगितले. त्याच्याकडून मोटारसायकल (एमएच 10 बीएच 1503) जप्त करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक रमेश भिंगारदेवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक प्रशांत पाटील, उपनिरीक्षक दादासाहेब बुधावले, हेड कॉन्स्टेबल दिनेश माने, हरिबा चव्हाण, सचिन महाडिक, सुनील

कोकाटे, विशाल बिले, सूरज पाटील आदिंच्या पथकाने ही कारवाई केली. याप्रकऱणी सुनील म्हारनूर यांनी फिर्याद दिली आहे दोघेही करतात खिडक्या दुरूस्तीचे काम
यातील मृत संजय जाधव आणि संशयित प्रकाश जगताप दोघेही स्लायडिंग खिडक्या विक्री आणि दुरूस्तीचे काम करीत होते. लव्हली सर्कल येथील एका काचेच्या दुकानात संजय पूर्वी काम करीत होता.