Thu, Sep 20, 2018 14:28होमपेज › Sangli › उपअधीक्षक सुजाता पाटील कोथळे कुटुंबीयांना भेटल्या (व्हिडिओ) 

उपअधीक्षक सुजाता पाटील कोथळे कुटुंबीयांना भेटल्या (व्हिडिओ) 

Published On: Dec 23 2017 4:47PM | Last Updated: Dec 23 2017 7:11PM

बुकमार्क करा

सांगली : प्रतिनिधी

हिंगोली येथील पोलिस उपअधीक्षक सुजाता पाटील (मूळगाव, कोल्हापूर) यांनी अनिकेत कोथळेची मुलगी प्रांजलचे पालकत्व स्वीकारले आहे. तिचा सर्व शैक्षणिक खर्च करण्याची त्यांनी तयारी दर्शविली आहे. कोथळे कुटुंबियांची आज त्यांनी भेट घेतली. यावेळी त्यांनी प्रांजलच्या खर्चासाठी २५ हजारांचा चेक देत प्रांजलला खाऊ आणि खेळणी दिली.   

चोरीच्या गुन्ह्यात अटक केलेल्या अनिकेतला कोठडीत थर्ड डिग्री वापरल्याने त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर हे प्रकरण संपूर्ण राज्यभर गाजले.  कोथळे कुटुंबियांना शासनाने मदत दिली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही मदत दिली आहे. त्याशिवाय स्थानिक पातळीवरूनही या कुटुंबाला मदतीचा ओघ सुरू आहे. मूळच्या कोल्हापूरच्या असणार्‍या श्रीमती पाटील यांनी दि. 16 नोव्हेंबर रोजी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांना यासंदर्भात पत्र लिहिले होते.

त्यामध्ये मृत अनिकेतची तीन वर्षांची मुलगी प्रांजलचे पालकत्व स्वीकारून तिचा संपूर्ण शैक्षणिक खर्च करण्याची तयारी पाटील यांनी दर्शविली होती. पालकत्वाबाबत पुढील कार्यवाही करण्यासाठी पाटील शनिवारी सांगलीत येणार आहेत. त्यावेळी कोथळे कुटुंबियांकडून माहिती घेऊन त्या पुढील कार्यवाही करणार असल्याचे सांगण्यात आले.