Mon, Aug 19, 2019 04:56होमपेज › Sangli › गुर्‍हाळघरांना घरघर : उसाची पळवापळवी

गुर्‍हाळघरांना घरघर : उसाची पळवापळवी

Published On: Mar 04 2018 1:40AM | Last Updated: Mar 03 2018 10:54PMशिराळा  ः विठ्ठल नलवडे 

शिराळा व शाहूवाडी तालुक्यात साखर कारखान्यांमध्ये उसाची पळवापळव सुरू झाली आहे. तर ऊस कमी पडू लागल्याने  गुन्हाळघरांना घरघर लागली आहे. आता गुळाला सौद्यात चांगला दर मिळत आहे. मात्र शेतकर्‍यांना आपला ऊस  गुर्‍हाळघरांना घालता येत नाही. दरम्यान, साखरेचे दर उतरल्याने साखर कारखान्यांनी ऊसबिलाची पहिली उचल प्रतिटन 2500 रुपयाचीच देण्याचा निर्णय घेतला आहे. प्रतिटनाला 650 ते 700 रुपयाचा फटका बसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकर्‍यांनी कारखान्यास आपला खोडवा ऊस नोंदवल्यामुळे ऊस कारखाने नेऊ  लागले आहेत. या सार्‍यातून गुर्‍हाळघरांना ऊस उपलब्ध होणे कठीण बनले आहे. 

 बाजारपेठेत गुळाचे दर वाढले आहेत. मात्र गुर्‍हाळ मालकांना उसाची कमतरता भासू लागली आहे. शिराळा तालुक्यात मणदूर, सागाव, कोकरूड, वारणावती, कोतोली, बिळाशी, मांगरूळ आदी भागांत  गुर्‍हाळघरांची संख्या जास्त आहे. सध्या गुळाचा दर तीन हजार रुपयांच्या घरात पोहोचला आहे.  दर चांगला पण ऊस कमी अशी स्थिती निर्माण झाली आहे. अनेक  गुर्‍हाळमालक आपला गूळ किरकोळ विक्रीने स्थानिक बाजारात विकत  आहे.

शिराळा तालुक्यात यावर्षी जेमतेम आठ दहा गुर्‍हाळघरे सुरू झाली आहेत. दरम्यान, उसासाठी साखर कारखान्यांमध्ये सुरू झालेल्या अघोषित  स्पर्धेमुळे  गुर्‍हाळघरांना ऊस मिळत नसल्याचे चित्र आहे. यामुळे गुर्‍हाळमालकांना ऊस विकत घ्यावा लागत आहे. काही गुर्‍हाळचालक, मालकांनी स्वतःचाच ऊस गळितासाठी ठेवला आहे.

गुर्‍हाळघरात 30 किलोंच्या  रव्याऐवजी 10, 5, 2, 1 किलोच्या भेली काढल्या जात आहेत.  अनेक गुर्‍हाळ घरात काकवी, गुळवड्या किरकोळ विक्रीसाठी ठेवल्या आहेत. होलसेल व किरकोळ विक्री करून गुर्‍हाळमालक कसाबसा उत्पादन खर्च भागवत आहेत. यापूर्वी गुर्‍हाळघरांतनू नागरिकांना उसाचा रस, गूळ, काकवी, सोडागूळ, सेंद्रिय गूळ मोफत मिळायचा. मात्र आता गूळउत्पादनच महाग झाल्याने ही उत्पादने विकत घ्यावी लागत आहेत.  अनेक ठिकाणी रसाचीही विक्री केली जात आहे. 

गतवर्षी याच  काळात गुळाचा दर 4000 रु. च्या आसपास होता. मात्र साखरेच्या उतरलेल्या दराचा फटका आता शेतकरी बांधवांना बसत आहे. गूळ उद्योगाला ऊस मिळत नाही.