Sat, Jul 20, 2019 12:56होमपेज › Sangli › ऊसतोडीसाठी शेतकर्‍यांची दमछाक : फडकरी, ट्रॅक्टर चालकांकडून अडवणूक

ऊसतोडीसाठी शेतकर्‍यांची दमछाक : फडकरी, ट्रॅक्टर चालकांकडून अडवणूक

Published On: Feb 26 2018 1:18AM | Last Updated: Feb 25 2018 11:41PMभिलवडी : शीतलनाथ चौगुले

चालू गळीत हंगामात कारखान्याला ऊस पाठवताना शेतकर्‍याची पुरती दमछाक होताना दिसत आहे. अनेक ठिकाणी फडकरी व ट्रॅक्टर चालकांना रोकड दिल्याशिवाय तोड मिळणे अवघड झाले आहे.  आधीच कमी दराचे चटके सोसत असताना तोडीसाठी अधिकचे पैसे मोजावे लागल्याने ऊसउत्पादक आर्थिक अरिष्ठात सापडला आहे.

ऊस दराचा तोडगा एकोणतीनशे रुपयांवर निघाल्यावर ऊस उत्पादक शेतकर्‍यांची तोडीसाठी लगबग सुरू झाली. हंगाम सुरू होवून दोन ते तीन महिने उलटले तरी तोड मिळत नाही. यामुळे शेतकरी अस्वस्थ बनू लागला आहे. उसाला तुरा आला तरी तोड मिळण्याची चिन्हे दिसत नाहीत. 

कारखान्यांच्या गट कार्यालयात प्रोगॅ्रममध्ये नाव आले आहे का? हे पाहण्यासाठी बळीराजा हेलपाटे मारुन वैतागला आहे. प्रोग्रॅमध्ये नाव व क्रमांक  येऊनही फडकरी शेतात येण्यास तयार नाहीत. मुळातच  प्रत्येक कारखान्याच्या साधारणतः दोन ते पाच टोळ्सा तेही पाच तिथे आठ कोयते असलेल्या आहेत. यामुळे ऊस तुटण्यास विलंब होत आहे.

स्लिप बॉयचे फडकरी व ट्रॅक्टर चालक ऐकत नसल्याचे शेतकरी सांगत आहेत. या कारणास्तव सुरवातीला तोड मिळण्यासाठी दीड हजार मोजणार बळीराजा आता पाच हजारांवर रक्‍कम मोजत आहे. पैसे घे पण लवकर तोड दे, अशी विनंती करण्याची वेळ शेतकर्‍यांवर आली आहे.

पैसे देवून तोडीस सुरवात झाली की दोन दिवसांनी फड अर्ध्यावर सोडून टोळ्या दुसरीकडे तोड चालू करत आहेत. पैशांच्या हव्यासापोटी टोळ्या शेतकर्‍यांना अडकवून ठेवत आहेत. एकच टोळी दोन ते चार कारखान्यांना ऊस पाठवण्याचे प्रकार होत आहेत.  चार दिवसांतून एक खेप कारखान्याला जात आहे.