होमपेज › Sangli › उसाची थकित एफआरपी रक्कम तातडीने द्या

उसाची थकित एफआरपी रक्कम तातडीने द्या

Published On: May 09 2018 1:56AM | Last Updated: May 08 2018 8:05PMसांगली : प्रतिनिधी

उसाची थकित एफआरपी रक्कम जिल्ह्यातील कारखान्यांनी शेतकर्‍यांना तातडीने द्यावी, अन्यथा मालमत्ता जप्त करण्यात येईल, असे आदेश साखर आयुक्तांनी दिले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील आठ कारखान्यांनी ही रक्कम दिली आहे. पण सांगली जिल्ह्यातील कारखान्यांनी ती दिलेली नाही.

सांगली, कोल्हापूर जिल्ह्यासाठी एफआरपी +175 रुपये अशी तडजोड झाली होती. पहिल्या टप्प्यात एफआरपी व नंतर 175 अशी रक्कम देण्यास कारखानदारांनी तयारी दाखविली होती. हंगामाच्या पहिल्या दोन महिन्यांत बहुसंख्य कारखानदारांनी ठरल्याप्रमाणे रक्कम दिली. पण अखेरच्या महिन्यात साखरेचे दर पडल्याने पहिल्या हप्त्यात कपात करण्यात आली. 2900 रुपये ऐवजी 2500 असा हप्ता कारखान्यांनी बैठक घेऊन देण्याचे ठरले. याचा जबर फटका शेतकर्‍यांना बसला. प्रतिटन तब्बल 400 रुपये व त्याचे व्याज असा कोट्यवधींचे नुकसान सहन करावे लागते आहे. जिल्ह्यात अशी सुमारे 256 कोटी रुपयांची रक्कम थकित आहे.

याबाबत अंकुश संघटनेने साखर आयुक्तांकडे तक्रार केली होती. साखर आयुक्तांनी याची गंभीर दखल घेऊन कारखान्यांच्या मालमत्ता जप्तीचे आदेश दिले आहे. माणगंगा, महाकांली या कारखान्याविरोधात कारवाई सुरू केली आहे. इतर कारखान्यांना 15 टक्के व्याजासह रक्कम देण्याच्या नोटिसा बजावण्याचे काम सुरू केले आहे, असे या संघटनेचे अध्यक्ष धनाजी चुडमुंडे, राकेश जगदाळे यांनी सांगितले. आमची संघटना याचा पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

कोल्हापूर जिल्ह्याला जमते, मग सांगली जिल्ह्याला का नाही?

कारखाने साखरचे दर कोसळल्याचे कारण पुढे करीत आहेत. पण को-जनरेशन, मळी, बगॅस, अल्कोहोल, स्पिरीट यासह अन्य उपपदार्थांत कारखान्यांना मोठा नफा मिळाला आहे. त्यामुळे थकित एफआरपी देणे सहज शक्य आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील राजाराम, दत्त शिरोळ, ब्रिदी, जवाहर, डी.वाय. पाटील, घोरपडे या कारखान्यांनी उर्वरित हप्ता दिला आहे. शाहू व गुरुदत्त हे कारखाने लवकरच रक्कम देणार आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील कारखान्यांना हे जमते, मग सांगली जिल्ह्यातील कारखान्यांना का जमत नाही. याविरोधात संघटना आंदोलन करणार आहे.     

महेश खराडे, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना