Sat, Jan 19, 2019 20:17होमपेज › Sangli › वादळी पावसाने लाखोंचे नुकसान

वादळी पावसाने लाखोंचे नुकसान

Published On: Apr 19 2018 1:37AM | Last Updated: Apr 18 2018 10:44PMतासगाव : शहर प्रतिनिधी

शहरासह तालुक्यात मंगळवारी झालेल्या वादळी वार्‍यासह पावसाने लाखोंचे नुकसान झाले. शहरातील दत्तमाळ, मणेराजुरी रस्ता, बेंद्री रस्ता भागातील अनेकांच्या घराचे पत्रे, कौले उडून गेली. तर अनेकांच्या घरात वादळवार्‍यामुळे पाणी शिरले.  

मणेराजुरी रस्ता येथील खोरीमळा येथे राहणार्‍या किशोर गणपत माळी यांच्या घराचे पत्रे उडून गेले. यावेळी वरुन विटा डोक्यात पडून किशोर माळी व प्रेम माळी हे दोघे जखमी झाले. 

तासगाव शहरासह तालुक्याच्या पश्‍चिम भागात मंगळवारी जोरदार पाऊस झाला. दिवसभर उकाडा होता. सायंकाळी सहा वाजता वादळी वारे, विजांच्या गडगडाटासह जोरदार पावसाला सुरूवात झाली.  यावेळी अनेकांच्या घराचे पत्रे, कौले उडून गेल्यामुळे मोठे नुकसान झाले. दरम्यान शिरगाव (कवठे) येथेही जोरदार पाऊस व वार्‍यामुळे अनेकांच्या घराचे नुकसान झाले. वादळी वार्‍यामुळे वीजपुरवठा रात्री उशिरापर्यंत खंडित करण्यात आलेला होता. तर बुधवारी सकाळीही अनेक गावांत तारा तुटल्यामुळे वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम सुरू होते.