Fri, Jul 19, 2019 20:56होमपेज › Sangli › ‘पश्‍चिम महाराष्ट्र बालेकिल्ला’ विषय संपला

‘पश्‍चिम महाराष्ट्र बालेकिल्ला’ विषय संपला

Published On: Sep 12 2018 1:49AM | Last Updated: Sep 11 2018 11:40PMसांगली : प्रतिनिधी

पश्‍चिम महाराष्ट्र हा काँग्रेस-राष्ट्रवादीचा बालेकिल्ला, हा  विषय आता संपला आहे. आमदार जयंत पाटील हे आता माजी नेते आहेत. त्यांनी नेतृत्व विसरावे, असा टोला महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी येथे लगावला. 
भाजप नेते नगरसेवक शेखर इनामदार यांचा वाढदिवस आणि महापालिकेतील भाजपचा विजयोत्सव साजरा करण्यात आला. त्यावेळी इनामदार यांच्या नागरी सत्कारप्रसंगी ते बोलत होते.  सांगली, कोल्हापूरचे विषय संपले आहेत. पुढील आठवड्यात सातार्‍यातही  लक्ष घालणार आहोत. यापुढे तीनही जिल्ह्यांत फक्‍त भाजपच  असेल, असा दावाही त्यांनी केला.

पालकमंत्री सुभाष देशमुख, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खासदार संजय पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे, शिवाजीराव नाईक, विलासराव जगताप, महापौर संगीता खोत, उपमहापौर धीरज सूर्यवंशी, गटनेते युवराज बावडेकर, भाजप जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, माजी आमदार दिनकर पाटील, नितीन शिंदे, सांगली अर्बन बँकेचे अध्यक्ष गणेश गाडगीळ, दिलीप सूर्यवंशी, दीपक शिंदे, सुरेश आवटी, लिंगायत बोर्डिंगचे अध्यक्ष सुधीर सिंहासने आदिंसह सर्व नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते.

ना. पाटील म्हणाले,  2013 च्या मनपा निवडणुकीत भाजपचा पराभव झाला होता. तो  सल मनात ठेवून शेखर इनामदार यांनी मोर्चेबांधणी केली. भाजपच्या विजयाचे स्वप्न पाहिले.  त्यासाठी त्यांनी गाजावाज न करता मोर्चेबांधणी केली.  महापालिका निवडणूक याच मोर्चेबांधणीच्या जोरावर भाजपने  जिंकली. सांगली महापालिका तशी पाहिली तर केरळ, तमिळनाडू या राज्यांपेक्षा जिंकायला अवघड. पण आता सांगली जिंकल्यामुळे केरळ, तमिळनाडूतही आम्ही विजय मिळवू.

ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीचे प्रचारप्रमुख म्हणून इनामदार यांच्यावर जबाबदारी दिली आहे. खासदार संजय पाटील यांना ते देशात सर्वाधिक मताधिक्क्याने निवडून आणतील. तसेच सांगली जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघ आम्ही जिंकू.  एवढेच नव्हे; पश्‍चिम महाराष्ट्रातील सहा खासदार, सर्व आमदार भाजपचेच असतील. 
ना. खोत म्हणाले, ज्यावेळी पक्षाला गरज होती, त्यावेळी इनामदार यांनी चोख जबाबदारी पार पाडली आहे. यापुढेही त्यांच्यावर त्या पद्धतीने जबाबदारी सोपवू.
खासदार पाटील म्हणाले, मनपा निवडणुकीचे पडद्यामागून मायक्रोप्लॅनिंग इनामदार यांनी केले. आम्ही फक्‍त समोर होतो.

आमदार  गाडगीळ म्हणाले, माझ्या इथपर्यंतच्या वाटचालीत इनामदार यांचा सहभाग आहे.  मनपा सत्ता आणण्याचा गेल्या वाढदिवशी  केलेला संकल्प सत्ता परिवर्तन करून पूर्ण केला.  महापौर केबिनमध्ये त्यांचा आम्ही वाढदिवस साजरा केला. आता पुढे विकासाची जबाबदारी ते चोख पार पाडतील. सत्काराला उत्तर देताना इनामदार म्हणाले, माजी आमदार संभाजी पवार  यांच्या सोबतीने माझी वाटचाल सुरू झाली. मनपात भाजपसत्तेचे स्वप्न पाहिले.मोर्चेबांधणी केली. त्याला कार्यकर्त्यांनी आणि जनतेने साथ दिली. आता शहर विकासाची जबाबदारी पेलू.

11 माजी नगरसेवक भाजपमध्ये

इनामदार म्हणाले, काँगे्रेस-राष्ट्रवादीमुक्‍तीची लाट पुढेही सुरूच राहील. लवकरच 5 हजार मुस्लिम बांधवांसह 11 माजी नगरसेवक, दिग्गज कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. तो राष्ट्रवादीला दणका असेल. याप्रसंगी पद्माळे ग्रामपंचायत सदस्यांसह पदाधिकार्‍यांनी भाजपप्रवेश केला. नगरसेवक भारती दिगडे यांनी स्वागत केले. दिनकर पाटील यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे संयोजन श्रीराम प्रतिष्ठानचे धनेश कातगडे, गणपतराव साळुंखे, योगेश कापसे, पृथ्वीराज पाटील आदींनी केले.