Sun, May 26, 2019 09:09होमपेज › Sangli › सांगलीत वडिलांचा मुलाकडून निर्घृण खून

सांगलीत वडिलांचा मुलाकडून निर्घृण खून

Published On: Aug 17 2018 1:36AM | Last Updated: Aug 17 2018 12:38AMसांगली : प्रतिनिधी

येथे गुरुवारी रात्री सतीश विठ्ठल सोनटक्के (वय 50, रा. वारणाली कर्मचारी वसाहत, वारणाली) यांचा दगडाने ठेचून निर्घृण खून करण्यात आला. हे कृत्य त्यांच्या अल्पवयीन मुलाने केले आहे. वडील आईला सतत त्रास देतात, या कारणावरून हे कृत्य केल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, खुनाची माहिती समजल्यानंतर संजयनगर पोलिस ठाण्यातील कर्मचार्‍यांनी घटनास्थळी तत्काळ धाव घेतली. मुलाला ताब्यात घेतले असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती .

पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी ः सतीश हे पाटबंधारे विभागात नोकरीस होते. त्यांचा आणि त्यांच्या पत्नीचा किरकोळ कारणावरून सतत वाद होत असे. या वादातून अनेकवेळा ते पत्नीस मारहाण करीत. त्याशिवाय त्यांना दारूचेही व्यसन होते. दारूच्या नशेत अनेकवेळा ते पत्नीस शिवीगाळ करून मारहाण करीत. या सततच्या भांडणाला त्यांचा मुलगा वैतागला होता. अनेकवेळा मुलाने त्यांना समजाविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यांच्या वागण्यात कोणताही फरक पडलेला नव्हता. सतीश हे गुरुवारी सायंकाळी दारू पिऊन आले होते.  पत्नीबरोबर त्यांचा पुन्हा वाद झाला. रागाच्या भरात त्यांनी पत्नीस मारहाण करण्यास सुरुवात केली. ही मारहाण होत असतानाच त्यांचा मुलगा त्या ठिकाणी आला. त्याने वडिलांना अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते ऐकण्याच्या स्थितीत नव्हते. त्यावेळी मुलाबरोबरही सतीश यांचा वाद झाला. त्यावेळी मुलाने घरातील दगडाने सतीश यांना मारले. हा दगड डोक्यात वर्मी बसला, त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, या खुनाची माहिती संजयनगर पोलिस ठाण्यात मिळाल्यानंतर पोलिस पथकाने घटनास्थळी तत्काळ धाव घेतली. त्या अल्पवयीन मुलास पोलिसांनी ताब्यात घेतले. घटनास्थळाचा पंचनामा केला. हा अल्पवयीन मुलगा इयत्ता बारावीमध्ये शिकत आहे.