होमपेज › Sangli › सॉफ्टवेअर बिघडल्याने अखेर ऑफलाईनने पगार

सॉफ्टवेअर बिघडल्याने अखेर ऑफलाईनने पगार

Published On: Feb 06 2018 1:49AM | Last Updated: Feb 05 2018 10:21PMसांगली : प्रतिनिधी

शालार्थ प्रणालीच्या डाटा बेस सॉफ्टवेअरमध्ये दि. 12 जानेवारीपासून तांत्रिक दोष निर्माण झाला आहे. शालार्थ प्रणाली बंद पडली आहे.शासनाने शिक्षकांचा जानेवारी 2018 चा पगार ऑफलाईनने काढण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यात शिक्षकांना दि. 15 फेब्रुवारीपर्यंत पगार मिळण्याचे संकेत आहेत. दरम्यान ‘इमर्जन्सी ऑप्शन’चा अवलंब केल्यास दि. 10 ते 11 फेब्रुवारीपर्यंत शिक्षकांना पगार मिळतील. 

शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे वेतन शालार्थ प्रणालीद्वारे ऑनलाईन पद्धतीने काढले जाते. प्रणालीत निर्माण झालेली या अडचण दूर करण्यास काही कालावधी लागणार आहे. त्यामुळे राज्यातील खासगी अंशत: व पुर्णत: अनुदानित, स्थानिक स्वराज्य संस्था व अध्यापक विद्यालयातील शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारींचे जानेवारी 2018 चे वेतन ऑफलाईन पद्धतीने काढले जाणार आहे. 

दरम्यान सांगली जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाशी संपर्क साधला असता ऑफलाईनने पगार काढण्याचा शासन निर्णय प्राप्त झाल्याचे सांगण्यात आले. दहा पंचायत समितींकडून ऑफलाईनने पगारासंदर्भात मागणी घेऊन जिल्हास्तरावर एकत्रित करणे, अर्थ विभागातून ट्रेझरीला सादर करणे व नंतर शिक्षकांना पगार मिळणे यासाठी दहा दिवस लागतील, असे सांगण्यात आले.

दरम्यान ‘ट्रेझरी’ने ‘इमर्जन्सी ऑप्शन’ अवलंबल्यास दि. 10 पर्यंत शिक्षकांना पगार मिळू शकेल.