होमपेज › Sangli › वसगडेत चिमुकलीने वाचवले भावाचे प्राण

वसगडेत चिमुकलीने वाचवले भावाचे प्राण

Published On: Jan 23 2018 9:02AM | Last Updated: Jan 23 2018 9:02AMभिलवडी : प्रतिनिधी

वसगडे (ता. पलूस) येथील स्नेहल सुनील शिरोटे या चार वषार्र्च्या चिमुकलीने आपल्या सुजल या दोन वर्षाच्या भावाचे प्राण वाचवले. ही घटना रविवारी घडली. सकाळी आठची वेळ होती.  शिरोटे कुटुंबातील सर्वजण  घरातील कामात व्यस्त होते. स्नेहल व   सुजल  दोघेजण  अंगणात खेळत होते.  दोन वर्षाचा सुजल खेळत- खेळत बाहेर असणार्‍या   पाण्याने भरलेल्या  टाकी ( 500 लिटर) च्या कठड्यावर उभा राहून पाण्यात पाहत होता. 

स्नेहलला धोका कळला. ती धावत भावाजवळ पोहोचली.   सुजल तोल जाऊन पाण्यात पडत होता. क्षणाचाही विलंब न लावता स्नेहलने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला.  तिच्या हाती सुजलचा  पाय सापडला.  मात्र तोंड पाण्यात गेल्याने सुजल गटांगळ्या खात होता. 

स्नेहल मोठ्याने ओरडली. या आवाजाने घरातील  सर्वजण धावत बाहेर आले.काळजाचा ठोका चुकवणारे द‍ृष्य समोर घडत होते. सुजलला बाहेर काढण्यात आले. आणखी काही सेकंदांचा वेळ गेला असता तर अनर्थ घडला असता. मुलीचे कौतुक  करणारे वडील  पाहून सर्वांचे डोळे पाणावले. स्नेहलने प्रसंगावधान राखत धाडसाने  भावाचे प्राण वाचवल्याने तिचे परिसरात कौतुक होत आहे.