Thu, Jun 20, 2019 21:08होमपेज › Sangli › स्वबळाचा नारा गायब; आघाड्यांचे पेव

स्वबळाचा नारा गायब; आघाड्यांचे पेव

Published On: May 19 2018 1:35AM | Last Updated: May 18 2018 8:04PMसांगली : अमृत चौगुले

महापालिका निवडणुकीची रणधुमाळी आता जोर धरू लागली आहे. त्यादृष्टीने इच्छुकांसह पक्षीय पातळीवरही उमेदवारीसाठी ‘विनिंग मेरिट’नुसार उमेदवारीची चाचपणी सुरू आहे. हे सर्व होत असताना चार-सहा महिन्यांपूर्वी सर्वच पक्षांनी स्वबळाचा नारा देत  झेंडा फडकविण्याच्या घोषणा केल्या  होत्या. त्याचा आता सर्वच पक्षांना विसर पडला आहे. उलट प्रत्येकाने आपापल्या मर्यादा ओळखून हात-पाय आखडते घेत आघाडीची भाषा सुरू केली  आहे. 

कार्यकर्ते, इच्छुकांचे काहीही होवो, पण सत्तेचा पल्ला गाठता यावा, अशी प्रत्येक पक्षाची धडपड सुरू झाली आहे. मात्र त्यातही ज्यांना आघाड्यांतून तोटा आहे त्यांनी मात्र त्यात विघ्न आणण्यासाठी ‘मिठाचा खडा’ टाकण्यास सुरुवात केली आहे. त्याला उत्तर-प्रत्युत्तरांची सरबत्तीही सुरू आहे. एकूणच यामुळे निवडणुकीपूर्वी राजकीय खल चांगलाच रंगू लागला आहे. मनपा निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी बरोबरच भाजप, शिवसेना, जिल्हा सुधार समिती-आप असे अनेक पर्याय पुढे आले आहेत. त्यादृष्टीने आता निवडणुकीसाठी लोकजागृती, भ्रष्टाचाराचा पंचनामा सुरू आहे. प्रत्येकानेच निवडणूक प्रतिष्ठेची बनवत आम्ही विकासाचे सांगाती असा राग आळविण्यास सुरुवात केली आहे. सर्वच पक्षांकडून इच्छुकांचे अर्ज मागविण्याची प्रक्रियाही सुरू आहे.  इच्छुकांनीही संधी सहजसुलभ व्हावी यादृष्टीने पक्षांची चाचपणी सुरू केली आहे. दुसरीकडे पक्षांनीही जनतेच्या पसंतीपेक्षा ‘विनिंग मेरिट’मध्ये कोण बसेल याचाही सर्र्वेे सुरू ठेवला आहे. 

जिल्हा सुधार समिती-आप ही पहिल्यांदाच मैदानात उतरत आहे. त्यांचा लोकसहभागातून विकास आणि त्यावरच सत्तेचे राजकारण असा अजेंडा आहे. त्यादृष्टीने त्यांची आघाडी काम करीत आहे. ती वगळता सर्वच जणांनी स्व:बळाचा नारा देत पुन्हा निवडणुकीची तयारी सुरू केली होती. त्यासाठी सभा, मेळाव्यांद्वारे गेल्या दोन-तीन महिन्यांत स्व:बळावर जिंकू अशा वल्गनाही केल्या होत्या. परंतु  दोन-तीन महिन्यांत  प्रभागांचा विस्तार पाहता सर्वांना वास्तवाची जाणीव झाली आहे.  त्यादृष्टीने शहरात सर्वांनाच स्व:बळाचे गणित जमणे अशक्यप्राय वाटू लागले आहे. तसे निष्कर्ष सर्वेतूनही समोर आल्याचे दिसते.
त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीने स्व:बळ सोडून समविचारी पक्षांशी आघाडीचा सूर आळवला आहे. त्याला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह स्थानिक नेत्यांनीही दुजोरा दिला आहे. काँग्रेसकडूनही प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, युवकचे प्रदेशाध्यक्ष आमदार डॉ. विश्‍वजित कदम, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील आदींनी दुजोरा दिला आहे. परंतु निर्णय गुलदस्त्यात आहे. 

भाजपनेही त्यादृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत. आरपीआय त्यांच्यासोबत आहेच. आता महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री सुभाष देशमुख, खासदार संजय पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे यांनीही  तयारी सुरू केली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीतून आजी-माजी नगरसेवक फोडाफोडीच्या हालचाली सुरू ठेवल्या आहेत. काहीजणांच्या भेटी-गाठी सुरू आहेत. काहींनी भाजपकडून अर्जही नेले आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीविरोधी सोयीस्कर आघाड्यांचाही विचार सुरू आहे. आता शिवसेनेचा निर्णय काय होतो, याकडे सर्वांचे लक्ष आहे. परंतु शिवसेनेला न विचारल्याने त्यांनी स्व:बळाचा नारा सुरू ठेवला आहे.  अनेक पक्षांत इच्छुकांची मांदियाळी पाहता आघाड्यांतून सर्वांना संधी मिळणे अशक्यप्राय आहे. पाडापाडीचे, बंडखोरीचे राजकारण पक्षाला मारक नको अशीही भूमिका पुढे आली आहे. पक्षाबरोबरच इच्छुकही तसे हुशार आहेत. मातब्बरांसह नवइच्छुकांनीही सर्वच पक्षांकडे उमेदवारीचे मागणी अर्ज आणले आहेत. काहीजणांनी दोन-तीन पक्षांकडे अर्ज भरून दावेदारी सांगितली आहे.आता आघाड्या सोयीस्कर की मारक याचा अभ्यास पुढे करू असाच सर्वांचा सूर आहे. फक्‍त लोकांपर्यंत आपण इच्छुक आहे असे सांगत पुढे येत आहेत. यामुळे कोण कोणत्या पक्षातून हे मात्र अद्याप कोणीही सांगू शकत नाही.

सर्वच पक्षांकडून शहर विकासाचा अजेंडाच गायब 

महापालिका स्थापनेपासून ही सातवी निवडणूक होत आहे. आतापर्यंत शहराच्या विकासाची वचने, आश्‍वासने जाहीरनाम्यातून पुढे आली. सांगलीचे शांघाय करू असे म्हणत प्रत्येकवेळी नव्या आघाड्या आणि पक्षांनी विद्यमान सत्ताधार्‍यांवर टीकेची झोड उठवली. आताही पुन्हा तसाच प्रकार निवडणुकीच्या निमित्ताने समोर येणार आहे. निवडणुकीचा कालावधी दोन महिने आहे. परंतु कोणाची कोणाशी आघाडी होते हे स्पष्ट नसल्याने अद्याप तरी हा विकासनामा काही कोणाकडूनच पुढे आलेला नाही. उलट पुन्हा राजकीय फड  रंगणार आणि त्यात मूळ विकासाची शहराची गरजच हरवणार हे स्पष्ट आहे.